तेली – केसरकर यांच्यात विधानसभा उमेदवारीवरून संघर्ष

तेली – केसरकर यांच्यात विधानसभा उमेदवारीवरून संघर्ष

सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्येच तू- तू मैं- मैं चा खेळ सुरू झाला आहे. कारण , राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे होमपीच असलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपने आणि विशेषता: माजी आमदार राजन तेली यांनी हा मतदारसंघ भाजपलाच मिळावा अशी मागणी खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे केसरकर आणि तेलींमध्ये एकप्रकारे संघर्ष सुरू झाला आहे. या निवेदनात तेलींनी म्हटले आहे की सावंतवाडी मतदारसंघ भाजपलाच मिळावा तसेच शिवसेना म्हणजे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील लेखाजोखाच त्यांनी या निवेदनात मांडला आहे .त्यामुळे भाजप आणि शिवसेना घटक असलेल्या महायुतीमध्येच विधानसभा निवडणूक उमेदवारीवरूनच वाद विकोपाला जाणार आहे. दरम्यान, शिक्षण मंत्री केसरकर यांनी या प्रश्नावर नेहमीप्रमाणे शांत आणि संयमाची भूमिका घेतली असून मी महायुतीचा धर्म पाळणारा माणूस आहे. मला कुणाच्याही वादात जायचे नाही. मी फक्त महायुती आणि जिल्ह्याचा विकास यालाच महत्व देतो. विधानसभेत सावंतवाडी मतदारसंघात भाजपलाच उमेदवारी मिळावी अशी मागणी राजन तेलींनी स्वार्थासाठी केली असेल त्याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही. मात्र महायुतीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र आहोत. राजन तेली सावंतवाडी मतदारसंघात तीन वेळा उभे होते मात्र या मतदारसंघातील जनतेने त्यांना नाकारले आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काय बोलणार असे केसरकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील राजन तेली आणि केसरकर यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली आहे असेच म्हणावे लागेल.