प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा

विरोधी पक्षनेत्यांसह काँग्रेसची मागणी म्हापसा : आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर पाडून त्यांना बेघर करण्यात आले आहे, ही दुर्दैवी बाब असून अशा पोलिसांना मुख्यमंत्र्यांनी त्वरित निलंबित करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी आगरवाडेकर कुटुंबीयांना भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केली. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात जे आयपीएस अधिकारी गुंतले आहेत, […]

प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा

विरोधी पक्षनेत्यांसह काँग्रेसची मागणी
म्हापसा : आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर पाडून त्यांना बेघर करण्यात आले आहे, ही दुर्दैवी बाब असून अशा पोलिसांना मुख्यमंत्र्यांनी त्वरित निलंबित करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी आगरवाडेकर कुटुंबीयांना भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केली. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात जे आयपीएस अधिकारी गुंतले आहेत, त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.एसआयटी चौकशीच्या नावाखाली पोलीस जमिनी घेत आहेत. हे पोलीस गोमंतकीयांचे की दिल्लीवाल्यांचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न आम्ही येत्या विधानसभेतही उपस्थित करणार आहोत, असेही आलेमाव म्हणाले.
काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, आगरवाडेकर कुटुंबीय पोलीस स्थानकात गेले तेव्हा तेथे त्यांची तक्रार घेण्यास कोणीही तयार नव्हते. काँग्रेसचे आमदार कार्लोस फेरेरा तेथे आले तेव्हा पोलिसांनी लोकांना दाखविण्यासाठी जोसीबी चालकास अटक केली. मुख्य आरोपी पूजा शर्मा खुलेआम फिरत आहे. पूजा शर्माचे पती आयपीएस अधिकारी असून त्यांनी गोव्यातील डीजीपीना फोन करून आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर पाडण्यास पोलीस संरक्षण देण्यास सांगितले. पोलिसांनी शर्मा यांना संरक्षण देऊन पूर्वनियोजितपणे घर मोडले आहे, असा दावा करुन या प्रकरणात गुंतलेले हनीफ व इमरान या दोघांनाही मुख्यमंत्र्यांनी अटक करण्याचा आदेश पोलिसांना द्यावा. तसेच गोव्याच्या डीजीपीवर कारवाई करावी. हणजूण पोलीस निरीक्षकांना बडतर्फ करावे. पूजा शर्माला अटक करावी, अशा मागण्याही पाटकर यांनी केल्या.
जनतेकडून पैस घेऊन घर उभारु : अॅल्टन 
केपेचे आमदार अॅल्टन डिकॉस्ता म्हणाले की, सध्या पावसाचे दिवस आहेत. सर्वजण येथे भेट देऊन याबाबत बोलतात, मात्र त्यांचे घरही महिन्याभरात बांधून द्यायला पाहिजे. आम्ही काँग्रेस नेते एकत्र येऊन लोकांकडून निधी उभारून त्यांना घर उभारण्यास मदत करणार आहोत, असे आमदार अॅल्टन डिकॉस्ता म्हणाले.
न्यायालयाने सुमोटो दखल घ्यावी : खलप
काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप म्हणाले की, या प्रकरणाची सुमोटो दखल उच्च न्यायालयाने घ्यावी. 24 वर्षे येथे आगरवाडेकर कुटुंबीय राहतात, त्यांना बेघर करतात हा खुनी प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारावी आणि त्वरित कारवाई करावी. भाजपनेही आमच्यात सामील व्हावे. गोवा राज्य वाचविण्यासाठी एकत्र या, आता खरे आंदोलन सुरू झाले आहे, असेही खलप म्हणाले. अमरनाथ पणजीकर, राजेंद्र घाटे, कपिल कोरगावकर, अमृत आगरवाडेकर, राजेंद्र कोरगांवकर, विवेक डिसिल्वा, पार्वती नागवेकर, प्रतिक्षा खलप, चंदन मांद्रेकर, प्रणव परब, लॉरेन्स सिक्वेरा, उत्तर गोवा अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर, सुदिन नाईक, सांखळी गटाध्यक्ष मंगलदास नाईक यावेळी उपस्थित होते.