गोवावेसचा पेट्रोलपंप चालविण्यास कंपनी इच्छुक

थकीत तसेच आताच्या बोलीप्रमाणे भाडे दिल्यास मनपाही तयार बेळगाव : गोवावेस येथील पेट्रोलपंप ऑनलाईनद्वारे लिलाव करण्यात आला तरी भारत पेट्रोलियम कंपनीने उच्च न्यायालयामध्ये आम्हालाच पेट्रोलपंप चालविण्यासाठी द्यावा, अशी मागणी केली. त्यावर महानगरपालिकेच्या वकिलांनी सध्या जी बोली लागली आहे त्यापेक्षा अधिक भाडे, तसेच मागील थकीत भाडे दिल्यास आम्ही पेट्रोलपंप चालविण्यास देऊ, असे न्यायालयासमोर म्हणणे मांडले. त्यावर […]

गोवावेसचा पेट्रोलपंप चालविण्यास कंपनी इच्छुक

थकीत तसेच आताच्या बोलीप्रमाणे भाडे दिल्यास मनपाही तयार
बेळगाव : गोवावेस येथील पेट्रोलपंप ऑनलाईनद्वारे लिलाव करण्यात आला तरी भारत पेट्रोलियम कंपनीने उच्च न्यायालयामध्ये आम्हालाच पेट्रोलपंप चालविण्यासाठी द्यावा, अशी मागणी केली. त्यावर महानगरपालिकेच्या वकिलांनी सध्या जी बोली लागली आहे त्यापेक्षा अधिक भाडे, तसेच मागील थकीत भाडे दिल्यास आम्ही पेट्रोलपंप चालविण्यास देऊ, असे न्यायालयासमोर म्हणणे मांडले. त्यावर विचारविनिमय करण्यासाठी 30 जानेवारीपर्यंत कंपनीने मुदत मागितली आहे. गोवावेस येथील पेट्रोलपंप चालविण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. मात्र भाडेकरूच्या थकीत बिल आणि महानगरपालिकेने घेतलेल्या भूमिकेमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
महानगरपालिकेने घाईगडबडीत ऑनलाईनद्वारे लिलाव प्रक्रिया राबविली. 5 लाख 41 हजार मासिक भाडे यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र त्याविरोधात भारत पेट्रोलियम कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी यावर युक्तिवाद झाला. यावेळी भारत पेट्रोलियमच्या वकिलांनी 2 लाख 13 हजार भाडे देऊ, आम्हाला पेट्रोलपंप चालविण्यास द्यावा, अशी मागणी केली. त्यावर महापालिकेच्या वकिलांनी लिलावाद्वारे 5 लाख 41 हजार रुपये बोली झाली आहे. त्यापेक्षा अधिक भाडे दिल्यास, तसेच पूर्वीचे थकीत भाडे द्यावे. निश्चितच आम्ही संबंधित कंपनीला पेट्रोलपंप चालविण्यास देऊ, असे सांगितले. उच्च न्यायालयातील या युक्तिवादातून भारत पेट्रोलियम कंपनीच्या वकिलांनी यावर विचार करण्यासाठी 30 जानेवारीपर्यंत मुदत द्यावी, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने 30 जानेवारीपर्यंत मुदत दिली असून कंपनीच्या म्हणण्यानंतरच गोवावेस येथील पेट्रोलपंपचा वाद मिटणार आहे.