चापगाव-चिक्कदिनकोप रस्ता उद्ध्वस्त

संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांमुळे डबक्याचे स्वरुप : त्वरित दुरुस्तीची मागणी खानापूर : चापगाव-चिक्कदिनकोप हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. या रस्त्यावरुन दळणवळण करणे अत्यंत धोकादायक बनलेले आहे. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचत असल्याने संपूर्ण रस्त्याला डबक्याचे स्वरुप आले आहे. जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे तात्पुरती तरी खड्डे बुजवावेत, अशी मागणी या भागातील जनतेतून होत […]

चापगाव-चिक्कदिनकोप रस्ता उद्ध्वस्त

संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांमुळे डबक्याचे स्वरुप : त्वरित दुरुस्तीची मागणी
खानापूर : चापगाव-चिक्कदिनकोप हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. या रस्त्यावरुन दळणवळण करणे अत्यंत धोकादायक बनलेले आहे. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचत असल्याने संपूर्ण रस्त्याला डबक्याचे स्वरुप आले आहे. जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे तात्पुरती तरी खड्डे बुजवावेत, अशी मागणी या भागातील जनतेतून होत आहे.
चापगाव ते चिक्कदिनकोप हा रस्ता जिल्हा पंचायत अंतर्गत येतो. या रस्त्याचे तत्कालीन आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांनी 2008 साली रस्त्याचे डांबरीकरण केले होते. त्यानंतर या रस्त्यासाठी कोणताच निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे चापगाव ते चिक्कदिनकोप हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून संपूर्ण रस्ता हा खड्ड्यांनी व्यापला आहे. त्यामुळे रस्त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडल्याने पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचून डबक्याचे स्वरुप निर्माण झाल्याने या रस्त्यावरुन दुचाकी अथवा चारचाकी चालवणे धोकादायक बनले आहे.
चापगाव ते चिक्कदिनकोप या रस्त्यावर चापगाव, वड्डेबैल, कोडचवाड, चिक्कदिनकोप, कग्गणगी, अवरोळी ही गावे येतात. या रस्त्यावरुन पारिश्वाड, बिडी गावांशी संपर्क होतो. त्यामुळे या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अथवा देखभालीसाठी जिल्हा पंचायतीने साफ दुर्लक्ष केल्याने या रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे.
त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना या रस्त्यावरुन प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे स्थानिक तसेच तालुका लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्याला डबक्याचे स्वरुप प्राप्त झाल्याने प्रवाशांना या रस्त्यावरुन प्रवास करताना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेकवेळा अपघात घडत आहेत. यासाठी जिल्हा पंचायतीने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी या भागातील जनतेतून होत आहे.