कॅन्टोन्मेंट बसस्थानक दुकानगाळ्यांना मिळाला मुहूर्त

भाडे कमी करून काढल्या जाणार निविदा : कॅन्टोन्मेंट बोर्ड मासिक बैठकीत निर्णय : विविध विषयांवर चर्चा बेळगाव : रेल्वेस्टेशनसमोरील कॅन्टोन्मेंट बसस्थानकात स्मार्ट सिटीअंतर्गत दुकानगाळे उभारण्यात आले होते. परंतु दुकानगाळ्यांना अव्वाच्यासव्वा भाडे आकारण्यात येत असल्याने या दुकानांना कोणीच बोली लावली नव्हती. अखेर कॅन्टोन्मेंट बोर्डने भाडे कमी करून निविदा काढण्याचा निर्णय मंगळवारी आयोजित कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मासिक बैठकीत […]

कॅन्टोन्मेंट बसस्थानक दुकानगाळ्यांना मिळाला मुहूर्त

भाडे कमी करून काढल्या जाणार निविदा : कॅन्टोन्मेंट बोर्ड मासिक बैठकीत निर्णय : विविध विषयांवर चर्चा
बेळगाव : रेल्वेस्टेशनसमोरील कॅन्टोन्मेंट बसस्थानकात स्मार्ट सिटीअंतर्गत दुकानगाळे उभारण्यात आले होते. परंतु दुकानगाळ्यांना अव्वाच्यासव्वा भाडे आकारण्यात येत असल्याने या दुकानांना कोणीच बोली लावली नव्हती. अखेर कॅन्टोन्मेंट बोर्डने भाडे कमी करून निविदा काढण्याचा निर्णय मंगळवारी आयोजित कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मासिक बैठकीत घेतला. यामुळे मागील दोन वर्षांपासून धूळखात असलेल्या दुकानगाळ्यांना मुहूर्त सापडणार आहे. कॅन्टोन्मेंटची मासिक बैठक तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी पार पडली. बैठकीला कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार राजू सेठ, सीईओ राजीवकुमार व नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर उपस्थित होते. स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या 12 दुकानांपैकी 6 दुकानगाळ्यांचा लिलाव येत्या काही दिवसांत केला जाणार आहे. यासाठी 5,500 रुपये मासिक भाडे निश्चित करण्यात आले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड अखत्यारित येणाऱ्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली होती. परंतु वर्कऑर्डर नसल्याने हे काम थांबले होते. मंगळवारी रस्ते, गटारी, इमारतींची देखभाल, शौचालय यांच्या वर्कऑर्डरला मंजुरी देण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी 2 लाख 50 हजार रुपये राखीव ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर कॅन्टोन्मेंटच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आला. 1924 च्या कायद्यामध्ये बदल करून 2006 च्या कायद्याप्रमाणे नियमावलीत बदल करण्यात आला आहे. मागील सीईओंनी एका कर्मचाऱ्याला विनाकारण कामावरून कमी केले होते. त्या कर्मचाऱ्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. संबंधित कर्मचाऱ्याला आपले मत व्यक्त करण्यासाठी आणखी एक संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. याबरोबरच इतर कामांबाबतही चर्चा करण्यात आली.
कॅन्टोन्मेंट शाळांमध्ये एनसीसीची गरज
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष असतानाही कॅन्टोन्मेंटमधील शाळांमध्ये एनसीसीचा समावेश करण्यात आला नसल्याने सुधीर तुपेकर यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. कॅन्टोन्मेंटमध्ये मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमांमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना एनसीसी प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी एनसीसीसाठीचा शाळांचा कोटा सध्या पूर्ण भरलेला असून पुढील काळात विचार केला जाईल, असे उत्तर देण्यात आले.