कडोली परिसरातील कोबी पीक बहरात

कडोली परिसरातील कोबी पीक बहरात

दरही चांगला : कोरोना महामारीपासून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
वार्ताहर /कडोली
कोरोना महामारीपासून तब्बल चार वर्षे दराअभावी आर्थिक संकटात सापडलेला कोबी उत्पादक मात्र यावर्षी सावरला असून कोबी पिकाला चांगला दर मिळत असल्याने उत्पादकांत समाधान व्यक्त होत आहे. ज्यावेळी कोरोना महामारी सुरू झाली त्यावेळेपासून तब्बल 4 ते 5 वर्षे कोबी उत्पादकांना फार मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. कोरोना महामारीच्या काळात बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे कोबी मालाची उचल झाली नव्हती. प्रसंगी शेतकऱ्यांना पिकावर रोटावेटर चालवून पीक करावे लागले होते. त्यानंतरही कोबी पिकाला चांगला दर मिळाला नाही. त्यामुळे दरवर्षी कोबी उत्पादक नैराश्येच्या छायेखाली वावरत होता. फार मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. परंतु यावर्षी कोबी पिकाला चांगला दर मिळत असल्याने उत्पादकांत समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वाढती उष्णता आणि पाण्याची खालावलेली परिस्थिती याला कारणीभूत आहे. गेल्यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाणामुळे भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी कोबीसह इतर पिकांचे उत्पादन कमी झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीना पाणीसाठा अधिक आहे. असे शेतकरीच कोबी पिकाची लागवड करण्यास सरसावला आहे. परंतु ज्यांच्या विहिरीने पाण्याची पातळी गाठली अशा शेतकऱ्यांत मात्र चिंता व्यक्त होत आहे. गेल्या दोन महिन्यापासून कोबी पिकाला प्रति 10 किलोला 120 ते 160 रुपयांपर्यंत दर मिळत गेला आहे. त्यामुळे कोबी उत्पादकांचे आर्थिक संकट काहेसे दूर होण्यास मदत झाली आहे. हा दर पाहून कोबी पिकाची लागवड अधिक वाढत आहे. कडोली परिसरातील बहुतांशी शेती क्षेत्रात कोबी पिकाची लागवड केलेली दिसून येत आहे.