भाजपने बेळगावचा गड राखला
जगदीश शेट्टर 1.78 लाख मताधिक्यांनी विजयी : काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर यांचा पराभव
बेळगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघावर भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी 7 लाख 62 हजार 029 मते घेऊन विजय मिळविला आहे. तर काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना 5 लाख 83 हजार 592 मते मिळाली आहेत. या विजयामुळे भाजपला आपला बालेकिल्ला अबाधित राखण्यात यश आले आहे. शेट्टर यांनी 1 लाख 78 हजार 437 मताधिक्क्याने हा विजय संपादन केला आहे. म. ए. समितीचे उमेदवार महादेव पाटील यांना 9,503 मते मिळाली आहेत.
बेळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये 8 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून सकाळी 6 वाजता स्ट्राँगरूम खोलण्यात आले. सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. 21 फेऱ्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 13 लाख 75 हजार 283 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 13 उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीला प्रारंभ केल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच शेट्टर यांनी आघाडी मिळविली होती. ती आघाडी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कायम राखली. या मतदारसंघातील निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट झाल्याने निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. स्थानिक विरुद्ध उपरे असा वाद रंगला होता. त्यामुळे निवडणुकीत रंगत चढली होती. या मतदारसंघातून 13 उमेदवारांनी निवडणूक लढविली असली तरी भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच ही लढत झाली आहे. दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून चारवेळा विजय संपादन केला होता. यानंतर त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळविला होता. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे भाजपचा गड राखण्यात यशस्वी झाले आहेत.
सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवली होती. पहिल्या फेरीमध्येच 41005 मते घेतली. तर मृणाल हेब्बाळकर यांना 31,625 मते मिळाली होती. ही आघाडी कायम ठेवत दुसऱ्या फेरीमध्ये 44,212 मते घेतली. मृणाल यांना 29,544 मते मिळाली. तिसऱ्या फेरीमध्ये शेट्टर यांना 39 हजार तर मृणाल यांना 28 हजार, चौथ्या फेरीत शेट्टर यांना 41 हजार, मृणाल यांना 29 हजार, पाचव्या फेरीत शेट्टर यांना 45 हजार तर मृणाल यांना 28 हजार, सहाव्या फेरीत शेट्टर 39 हजार, मृणाल 32 हजार, सातव्या फेरीत शेट्टर 39 हजार, मृणाल 36 हजार तर आठव्या फेरीमध्ये जगदीश शेट्टर यांना 25,690 मते मिळाली तर मृणाल हेब्बाळकर यांना 30,670 मते मिळाली. या फेरीमध्ये मिळालेली मते हेब्बाळकर यांना आशादायक ठरली होती. मात्र आठव्या फेरीनंतर त्यांना मतदारांकडून अपेक्षीत साथ मिळाली नाही व शेट्टर यांनी घेतलेली आघाडी कायम ठेवली. 14 व्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेल्या शेट्टर यांचा विजय निश्चित झाला होता. मतदारांकडून मिळालेली अपेक्षीत साथ पाहिल्यास शेट्टर यांचा विजय निश्चित धरण्यात आला होता. दुपारच्या विरामानंतर पुन्हा मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. उर्वरित सात फेऱ्यांमध्ये शेट्टर यांनी आपले मताधिक्क्य कायम ठेवले होते. एकूण 21 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यादरम्यान मतदारांनी शेट्टर यांना दिलेली साथ विजयाची नांदी ठरली. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या बेळगाव लोकसभा मतदारसंघ कोणाच्या ताब्यात जाणार? यावरून मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. अखेर भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांना मतदारांनी कौल दिल्याने विजय सोयीचा ठरला आहे.
शेट्टर यांना अधिकृत आदेशपत्र
विजयी झाल्यानंतर भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांना निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडून अधिकृत आदेशपत्र देण्यात आले. यावेळी भाजप समर्थकांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी भाजपने बेळगावचा गड राखला
भाजपने बेळगावचा गड राखला
जगदीश शेट्टर 1.78 लाख मताधिक्यांनी विजयी : काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर यांचा पराभव बेळगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघावर भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी 7 लाख 62 हजार 029 मते घेऊन विजय मिळविला आहे. तर काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना 5 लाख 83 हजार 592 […]