बेळगाव-उचगाव अनियमित बसफेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा

बससेवा सुरळीत करण्याची मागणी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा वार्ताहर /उचगाव बेळगाव शहरातील शाळा-कॉलेजना उचगावमधून बरेच विद्यार्थी, विद्यार्थिनींची रोज ये-जा सुरू असते. मात्र बेळगाव बस डेपोच्या बसफेऱ्या नियमित नसल्याने विद्यार्थी वर्गाची कुचंबणा होत असून बसखात्याच्या डेपो मॅनेजरनी तातडीने याची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बससेवा सुरळीत ठेवावी, अन्यथा बस रोको आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी आणि पालकवर्गाने दिला आहे. उचगाव येथे कॉलेज व […]

बेळगाव-उचगाव अनियमित बसफेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा

बससेवा सुरळीत करण्याची मागणी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
वार्ताहर /उचगाव
बेळगाव शहरातील शाळा-कॉलेजना उचगावमधून बरेच विद्यार्थी, विद्यार्थिनींची रोज ये-जा सुरू असते. मात्र बेळगाव बस डेपोच्या बसफेऱ्या नियमित नसल्याने विद्यार्थी वर्गाची कुचंबणा होत असून बसखात्याच्या डेपो मॅनेजरनी तातडीने याची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बससेवा सुरळीत ठेवावी, अन्यथा बस रोको आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी आणि पालकवर्गाने दिला आहे. उचगाव येथे कॉलेज व शाळेच्या मुलांची बसला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून बसमध्ये शिरताना मोठी कसरत करावी लागत आहे. उचगावला अर्ध्या तासाला एक बसफेरी पूर्वी होती.
परंतु हल्ली या बसफेऱ्या कमी झाल्याने शाळेकरी मुलांना त्याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उचगावातून सकाळी सहापासून हायस्कूल, कॉलेज व इतर कामासाठी बसने जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या ठिकाणी बससाठी मोठी गर्दी होत आहे. बसफेऱ्या अनियमित असल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. वेळेमध्ये कॉलेजला न पोचल्याने व हायस्कूलला न पोचल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी अनेकवेळा ग्रामपंचायतीच्यावतीने व गावच्यावतीने संबंधित बस अधिकाऱ्यांना निवेदन देऊनसुद्धा अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
यासाठी विद्यार्थ्यांनी यापूर्वीसुद्धा बस रोको आंदोलन केले होते. संबंधित बसडेपोचे अधिकारी उचगावला येऊन विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. सकाळी सहापासून अकरा वाजेपर्यंत तसेच दुपारी चार ते सहापर्यंत अर्ध्या तासाला एक बसफेरी सुरू करण्याचे मान्य केले होते. परंतु एक दोन दिवस वेळेत बस सोडल्यानंतर पुन्हा आणि आहे तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेज व शाळेला जाण्यासाठी स्थानकावर तासन्तास उभे राहावे लागत आहे. संबंधित बसखात्याने उचगावला वेळेत बस सोडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी होत आहे.