घरटा

चिव चिव चिव रे तिकडे तू कोण रे ? कपिलामावशी कपिलामावशी घरटा मोडून तू का जाशी ? नाही गं बाई मुळीच नाही मऊ गवत देईन तुशी

घरटा

चिव चिव चिव रे

तिकडे तू कोण रे ?

 

कपिलामावशी कपिलामावशी

घरटा मोडून तू का जाशी ?

 

नाही गं बाई मुळीच नाही

मऊ गवत देईन तुशी

 

कोंबडीताई कोंबडीताई

माझा घरटा पाहिलास बाई ?

 

नाही गं बाई मुळीच नाही

तुझा माझा संबंध काही

 

कावळेदादा कावळेदादा

माझा घरटा नेलास बाबा ?

 

नाही गं बाई चिमणुताई

तुझा घरटा कोण नेई ?

 

आता बाई पाहू कुठे ?

जाऊ कुठे ? राहू कुठे ?

 

गरीब बिचाऱ्या चिमणीला

सगळे टपले छळण्याला

 

चिमणीला मग पोपट बोले

का गं तुझे डोळे ओले?

 

काय सांगू बाबा तुला

घरटा माझा कोणी नेला

 

चिऊताई चिऊताई

माझ्या घरट्यात येतेस बाई ?

 

पिंजरा किती छान माझा

सगळा शीण जाईल तुझा

 

जळो तुझा पिंजरा मेला

त्याचे नाव नको मला

 

राहीन मी घरट्याविना

चिमणी उडून गेली राना

 

कवी- बालकवी(त्र्यंबक बापूजी ठोंबरे)