आनंदी आनंद गडे !

आनंदी आनंद गडे ! इकडे तिकडे चोहिकडे वरती खाली मोद भरे वायूसंगे मोद फिरे नभांत भरला दिशांत फिरला जगांत उरला मोद विहरतो चोहिकडे

आनंदी आनंद गडे !

 

आनंदी आनंद गडे !

इकडे तिकडे चोहिकडे 

 

वरती खाली मोद भरे 

वायूसंगे मोद फिरे 

नभांत भरला 

दिशांत फिरला 

जगांत उरला 

मोद विहरतो चोहिकडे  

आनंदी आनंद गडे !

 

सूर्यकिरण सोनेरी हे

कौमुदि ही हसते आहे 

खुलली संध्या प्रेमाने

आनंदे गाते गाणे 

मेघ रंगले

चित्त दंगले

गान स्फुरले 

इकडे तिकडे चोहिकडे  

आनंदी आनंद गडे !

 

नीलनभी नक्षत्र कसे

डोकावुनि हे पाहतसे 

कुणास बघते ? मोदाला; 

मोद भेटला का त्याला ? 

तयामधे तो, 

सदैव वसतो, 

सुखे विहरतो 

इकडे तिकडे चोहिकडे  

आनंदी आनंद गडे !

 

वाहति निर्झर मंदगती

डोलति लतिका वृक्षतती 

पक्षी मनोहर कूजित रे

कोणाला गातात बरे ? 

कमल विकसले 

भ्रमर गुंगले

डोलत वदले 

इकडे तिकडे चोहिकडे 

आनंदी आनंद गडे !

 

स्वार्थाच्या बाजारात

किती पामरे रडतात 

त्यांना मोद कसा मिळतो?

सोडुनि स्वार्था तो जातो 

द्वेष संपला

मत्सर गेला

आता उरला 

इकडे तिकडे चोहिकडे 

आनंदी आनंद गडे !

कवी- बालकवी(त्र्यंबक बापूजी ठोंबरे)