आली बघ गाई गाई

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात फुललासे निशिगंध, घोटळली ताटव्यांत आली बघ गाई गाई, चांदण्याचे पायी चाळ लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल?

आली बघ गाई गाई

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात

फुललासे निशिगंध, घोटळली ताटव्यांत

 

आली बघ गाई गाई, चांदण्याचे पायी चाळ

लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल?

 

आली बघ गाई गाई, लावी करांगुली गाली

म्हणुन का हसलीस, उमटली गोड खळी

 

आली बघ गाई गाई, लोचनांचे घेई पापे

म्हणून का भारावले, डोळे माझ्या लाडकीचे?

 

आली बघ गाई गाई कढितसे लांब झोका

दमलीस खेळुनिया, झाक मोतियांच्या शिंपा

 

कवी-  इंदिरा संत