महुआ मोईत्रांविरोधात ‘राजमाता’ मैदानात

भाजपच्या मास्टरस्ट्रोकने तृणमूल काँग्रेसला धक्का वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या भाजपने अनेक ठिकाणी तगडे उमेदवार उतरवण्याचा सपाटा सुरू केला आहे. भारतीय जनता पक्षाने नुकतीच उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत 111 उमेदवारांची नावे असून पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदारसंघातून पक्षाने राजमाता अमृता रॉय यांना तिकीट दिले आहे. त्यांची लढत […]

महुआ मोईत्रांविरोधात ‘राजमाता’ मैदानात

भाजपच्या मास्टरस्ट्रोकने तृणमूल काँग्रेसला धक्का
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या भाजपने अनेक ठिकाणी तगडे उमेदवार उतरवण्याचा सपाटा सुरू केला आहे. भारतीय जनता पक्षाने नुकतीच उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत 111 उमेदवारांची नावे असून पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदारसंघातून पक्षाने राजमाता अमृता रॉय यांना तिकीट दिले आहे. त्यांची लढत आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्याशी होणार आहे.
अमृता रॉय ह्या कृष्णनगरच्या राजबारीच्या (रॉयल पॅलेस) राजमाता आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या उमेदवारीबाबत तर्कवितर्क लावले जात होते. याचदरम्यान त्यांनी पाचच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शुभेंदू अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. आता त्यांची लढत मागील वर्षापासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्याशी होणार आहे.
देशातील रंगतदार लढतींमध्ये कृष्णनगर मतदारसंघाचाही समावेश झाला आहे. अमृता रॉय यांच्या उमेदवारीमुळे राज्यात भाजपला बळ मिळेल, असे निवडणूक तज्ञांचे मत आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा नेतृत्वाने अमृता यांना उमेदवार बनवण्याची तयारी दर्शवल्यानंतर पक्षाने त्यांच्याशी बोलणी सुरू केली. त्याचवेळी अमृता यांच्याशी निवडणूक लढविण्याबाबत बोलले असता त्यांनी होकार देताच त्यांचा पक्षप्रवेश घडवण्यात आला.
2029च्या निवडणुकीत टीएमसीच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी कृष्णनगर मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांना 6 लाखांहून अधिक मते मिळाली, तर भाजपचे कल्याण चौबे यांना एकूण 5 लाख मते मिळाली. महुआ मोईत्रा 63,218 च्या मोठ्या फरकाने विजयी झाल्या होत्या. मात्र, अलीकडच्या काळात येथे तृणमूल काँग्रेस कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे.