चेन्नई सुपर किंग्स-गुजरात टायटन्स आज

चेन्नई सुपर किंग्स-गुजरात टायटन्स आज

वृत्तसंस्था/ चेन्नई
विद्यमान विजेते चेन्नई सुपर किंग्ज व गुजरात टायटन्स यांच्यात आज मंगळवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात दोन नवे कर्णधार शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांची कसोटी लागणार आहे. फटकेबाजीसाठी ओळखले जाणारे हे दोन्ही सलामीवीर वर्चस्वाच्या लढाईत गुंतले असून चेन्नई आणि गुजरात मागील सामन्यात मिळविलेल्या विजयानंतर तीच गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.
24 वर्षांचा गिल हा ‘आयपीएल’मधील सर्वांत तरुण कर्णधार आहे, परंतु त्याने नेतृत्वाच्या भूमिकेत ‘मुंबई इंडियन्स’विरुद्ध आपली क्षमता दाखविलेली आहे. दुसरीकडे, धोनीच्या आश्रयाखाली गायकवाडने कर्णधार म्हणून पदार्पणातच आरसीबीवर सहा गडी राखून विजय मिळविताना प्रभावित करून सोडलेले आहे. पण ‘सीएसके’च्या गोलंदाजांना, खास करून वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेला अधिक सुधारित कामगिरी करून दाखवावी लागेल. चार बळी घेणाऱ्या मुस्तफिझूर रेहमानची षटके संपल्यानंतर सीएसकेच्या गोलंदाजांनी अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांना 95 धावांची भागीदारी आणि आरसीबीला चांगली धावसंख्या उभारू दिली.
देशपांडे भरपूर महागडा ठरलेला असून आणखी एक खराब कामगिरी त्याचे स्थान धोक्यात आणेल. कारण अनुभवी शार्दुल ठाकूर, जो चांगली फलंदाजी करू शकतो आणि मुकेश चौधरी हे संघात खेळण्याच्या संधीसाठी टपून बसलेले आहेत. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना देखील दुखापतीतून ठीक झाल्याने खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आला आहे. शिवाय रचिन रवींद्रचा फिरकी माऱ्यासाठी पर्याय म्हणून वापर केला जाण्याची शक्यता आहे. सीएसके त्यांच्या फलंदाजीच्या रचनेत बदल करण्याची शक्यता नाही. फॉर्ममध्ये असलेल्या रवींद्रने आयपीएल पदार्पणात ‘आरसीबी’विरुद्ध 15 चेंडूंत 37 धावा काढून प्रभावित केलेले आहे आणि हा किवी फलंदाज त्याच पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करेल.
मागील सामन्यात पदार्पण केलेला युवा खेळाडू समीर रिझवी फलंदाजीला आला नाही आणि तो आपली क्षमता दाखवण्यास उत्सुक असेल. धोनीही बेंगळूरविऊद्ध फलंदाजीस आला नाही आणि चाहते त्याची फटकेबाजी पाहण्यास उत्सुक असतील. दुसरीकडे, टायटन्सना स्फोटक सुरुवातीसाठी गिल व अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाची गरज भासेल. अझमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर व राहुल तेवतिया या मधल्या फळीतील फलंदाजांनाही योगदान द्यावे लागणार असून चेन्नईत जन्मलेला साई सुदर्शन चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चेपॉकवर त्यांचे फिरकीपटू रशिद खान आणि साई किशोर यांचीही भूमिका महत्त्वाची राहील.
संघ : चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशिदद, मिचेल सँटनर, सिमरजित सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महीश थिक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रेहमान, अरावेली अवनीश राव.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, रशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहऊख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुतार, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर, बी. आर. शरथ.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.