न्यायमूर्तींची पाठ फिरताच ‘येरे माझ्या मागल्या’!

न्यायमूर्तींची पाठ फिरताच ‘येरे माझ्या मागल्या’!

स्मार्ट सिटी कामांचा गेंधळ अद्याप कायम : विदेशी पर्यटकांनीही घेतला कटू अनुभव
पणजी : राज्यातील एखाद्या खाण परिसरालाही लाजवेल अशाप्रकारे राजधानीची दैनावस्था करून ठेवणाऱ्या ’स्मार्ट सिटी’ च्या गैरव्यवस्थापनाचे गंभीर परिणाम स्थानिकांसह सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. हे सर्व प्रकार असह्य होऊन काही नागरिकांना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले आणि या आरोपांचे गांभीर्य ओळखून व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी स्वत: न्यायमूर्तींना रस्त्यावर उतरावे लागले. राज्याच्या इतिहासात बहुदा प्रथमच असा प्रकार घडला असावा. परंतु एवढे होऊनसुद्धा स्मार्ट सिटी अधिकारी आणि निर्ढावलेले कंत्राटदार यांच्यावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. एवढी वर्षे लोकांचे हाल करून त्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहणाऱ्या व सरतेशेवटी त्यांच्यावर न्यायालयाची पायरी चढण्यापर्यंत वेळ आणणाऱ्या स्मार्ट सिटी आणि त्यांच्या कंत्राटदारांनी आपल्या संबंधित गैरकारभाराची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष न्यायमूर्ती येणार आहेत म्हटल्यावर दोन दिवस अगोदरच झाडू मारून, तसेच पाण्याची फवारणी वगैरे करून स्वच्छ करण्याचे प्रयत्न केले. परंतु ते करताना त्यांची स्वत:चीच एवढी दमछाक झाली की आपण केवढा घोळ आणि गोंधळ निर्माण करून ठेवला होता याचा स्वअनुभव त्यांनी घेतला. त्यामुळे ही कृत्ये लपता लपत नाहीत असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. आर्श्चकारक प्रकार म्हणजे न्यायमूर्तींची पाठ फिरताच संबंधित कंत्राटदारांनी सर्व उपाययोजना क्षणात बंदही पाडल्या. यावरून या सर्व उपाययोजना म्हणजे जनतेच्या आणि न्यायव्यवस्थेच्याही डोळ्यांना पाणी लावण्याचाच प्रकार होता, हेच स्पष्ट झाले आहे.
अजून बरीच कामे बाकी
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मिरामारपासून थेट रायबंदरपर्यंत हाती घेतलेल्या कामांपैकी 18 प्रकल्प पूर्ण होणे बाकी आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरालाच एखाद्या खाण परिसरासारखे रूप आलेले आहे. पावलोपावली मोठमोठी खोदकामे, सर्वत्र विखुरलेले बांधकाम साहित्य, त्यातून निर्माण होणारे धूळ प्रदूषण यामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी या खोदलेल्या खंदकांमध्ये वाहने ऊतण्याचेही प्रकार घडले आहेत. खोदकामांची माती वाहून गेल्यामुळे शहरातील गटारव्यवस्था तर पार लयास गेली आहे. ती वेळीच दुऊस्त न केल्यास यंदा पावसाळ्यात त्याचे परिणाम दिसून येणार आहेत.
कामे जुलैपर्यंत लांबण्याची शक्यता
अशा स्थितीत स्मार्ट सिटीने जाहीर केलेल्या 31 मे पर्यंतच्या डेडलाईनमध्ये ही कामे पूर्ण होणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही हेच दिसून येत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिगीश यांनी आपला पवित्रा बदलण्यास प्रारंभ केला आहे. परवा न्यायमूर्ती पाहणीसाठी आले तेव्हा त्यांनी ही कामे पूर्ण होण्यास जुलैपर्यंतचा वेळ लागेल असे दबक्या आवाजात बोलून दाखविले आहे. त्यावरून त्यांचा हाही प्रयत्न म्हणजे ‘वेळ मारून नेण्याचा’ प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या या कामांची व्याप्ती पाहता विद्यमान वर्ष सरले तरीही ती पूर्ण होणार नाहीत हेच सत्य आहे. कारण यापुढे पथदीप बसविणे, शहरातील विविध भागांमध्ये सुशोभिकरण, मांडवी नदीकिनारी पदपथ बांधणे, रायबंदर येथे बाजार प्रकल्प, मच्छीमारी जेटी तयार करणे, आदी कामे पूर्णत्वास नेणे बाकी आहे, यावरून हे सहजतेने लक्षात येते.