वैफल्यग्रस्ततेतून विरोधकांचे भाजपवर तोंडसुख : यतिश

वैफल्यग्रस्ततेतून विरोधकांचे भाजपवर तोंडसुख : यतिश

पणजी : विरोधी पक्षांनी आधी स्वत:चे उमेदवार जाहीर करावेत आणि नंतरच भाजपवर आरोप करावे, अशी टीका भाजप प्रवक्ते अॅड. यतिश नाईक यांनी केली आहे. तब्बल बारा याद्या जाहीर झाल्यानंतरही गोव्यातील एकसुद्धा उमेदवाराचे नाव त्यात झळकत नाही यावरून या पक्षांची झालेली दैनावस्था लक्षात येते व त्याच वैफल्यग्रस्ततेतून ते भाजपवर आरोप करत आहेत, असेही ते म्हणाले. बुधवारी भाजप मुख्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपने स्वत:चे दोन्ही उमेदवार जाहीर करून प्रचाराचाही धडाका लावला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसह गावोगावी लोकांशी संपर्क प्रारंभ करून प्रचाराची पहिली फेरीही जवळजवळ पूर्ण केली आहे. असे चित्र असताना विरोधी पक्षांचे काही नेते पणजीत वातानुकुलीत कार्यालयात बसून केवळ पत्रकार परिषदाच करत आहेत. हे सर्व प्रकार पाहता त्यांची ही टीका केवळ अर्थहीनच नव्हे तर हास्यास्पदही वाटते, असे अॅड. नाईक म्हणाले. बारा याद्या जाहीर झाल्यानंतरही उमेदवाराचे नाव जाहीर होत नाही याचाच अर्थ विरोधकांचे ’बारा वाजले’ आहेत, असाच होतो. म्हणूनच ते सैरभैर झालेले आहेत व त्यातून ते स्वत:चीच धिंड काढून घेत आहेत. खरे तर हीच चिंता त्यांना असायला हवी होती, परंतु तसे कोणतेही भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. उलटपक्षी ते भाजपवरच टीका आणि आरोप करण्यात वेळ खर्ची घालत आहेत, असे अॅड. नाईक म्हणाले.
‘तनात एक मनात एक’, ही कसली आघाडी?
आश्चर्यकारक प्रकार म्हणजे ज्या ‘इंडी’ आघाडीच्या नावाने देशातील अनेक विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत, त्यांची राज्याराज्यात वेगवेगळी समिकरणे दिसून येत आहेत. पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात एकमत नाही. तेच दोन्ही पक्ष दिल्लीत एकमेकांच्या गळाभेटी घेताना दिसतात. बंगालमध्ये टीएमसी आणि काँग्रेस एकमेकांचे तोंडही पाहत नाही, तेच दोन्ही पक्ष दिल्लीत हातात हात घेऊन एकतेचे प्रदर्शन करतात. केरळमध्ये सीपीएम आणि काँग्रेस यांच्यात वैरत्व आहे, तेच दोन्ही पक्ष दिल्लीत दोस्तीचे देखावे करतात, हे असे चित्र असताना या इंडी आघाडीला काय अर्थ राहतो, असा सवाल अॅड. नाईक यांनी उपस्थित केला.