जेजुरी गड विकासासाठी आठ कोटींचा निधी
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : तीर्थक्षेत्र जेजुरी गडविकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी राज्य नियोजन विभागाने आठ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे विकास आराखड्यातील कामांना गती मिळणार आहे. मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या अनियोजित जोडण्या व बांधकामे काढून गडाला पूर्ववैभव देण्याचे नियोजित आहे. कामे पूर्ण करण्याचा कालावधी 2 वर्षांचा आहे. शिखरदुरुस्तीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. जेजुरी गडविकास आराखड्याचा 349 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील 109 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन झाले आहे. 53 मोठी बांधकामे केली जाणार आहेत. त्यासाठी एकूण आठ कोटी रुपयांचा निधी नियोजन विभागाने वितरित केला आहे.
मुख्य खंडोबा मंदिर, तटबंदीचे जतन व दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये, दीपमाळेचे जतन व दुरुस्तीसाठी दोन कोटी, पायर्या, कमानींचे जतन आणि दुरुस्तीसाठी दोन कोटी, तर होळकर तलाव, पेशवे तलाव, जलकुंड तसेच पायर्या असलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी, असा एकूण आठ कोटी रुपयांचा निधी नियोजन विभागाने वितरित केला आहे.
पहिल्या टप्प्यात होणारी कामे
जेजुरी गडविकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यात वास्तूचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा आणि पर्यटक सोयीसुविधा, जलव्यवस्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये शास्त्रीय पद्धतीने दगडांची स्वच्छता, अनियोजित व हानिकारक जोडण्या काढणे, खराब झालेल्या चुन्याच्या गिलाव्याची डागडुजी, पाणीगळती थांबविण्यासाठी डागडुजी, विद्युत सोयी, पाणीपुरवठा, निचराव्यवस्था, मलनिसारण आणि त्या पाण्याचा पुनर्वापर, योग्य वायुविजन प्रणाली, मंदिर परिसरातील धूळ गोळा करण्यासाठी यंत्र, घनकचरा व्यवस्थापन, भक्तांसाठी सोयीसुविधा, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक योजना आदी कामे प्रस्तावित आहेत.
40 ते 50 लाख भाविक देतात भेट
श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र मंदिराचे सपोर्ट क्षेत्रफळ 167 चौरस मीटर असून, कोटाचे क्षेत्रफळ 1240 चौ. मी. आहे. येथे यात्रा-उत्सवाच्या वेळी दर दिवशी सुमारे दीड ते दोन लाख भाविक, तर वर्षात सुमारे 40 ते 50 लाख भाविक भेट देतात.
वेळेत कामे पूर्ण करण्याचे नियोजन
मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या अनियोजित जोडण्या व बांधकामे काढून गडाला पूर्ववैभव देण्याचे नियोजित आहे. कामे पूर्ण करण्याचा कालावधी 2 वर्षांचा असला तरी नियोजित वेळेपूर्वी कामे गुणवत्तापूर्व करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
Latest Marathi News जेजुरी गड विकासासाठी आठ कोटींचा निधी Brought to You By : Bharat Live News Media.