प्रासंगिक : ‘इको टुरिझम’ची चलती!

राजमोहन रासम
भारतात विविध भौगोलिक भूमी, अनेक पर्यटनस्थळे केवळ तणावातून मुक्त होण्यासाठीच नव्हे; तर नवी ऊर्जा, नवा उत्साह देण्यासाठी कारणीभूत ठरतात. आज दि. 28 जानेवारी हा भारतीय पर्यटन दिवस आहे. त्या निमित्त इको टुरिझमवर टाकलेला एक दृष्टिक्षेप…
नेहमीच वाढत राहणारा उद्योग म्हणजे पर्यटन. सोशल मीडिया नेटवर्किंगवर याबदद्दलच्या माहितीचा जसजसा प्रसार होत गेला, तसे देशभरातील विविध पर्यटनस्थळांची माहिती जनमानसांपर्यंत पोहोचू लागली. त्यामध्ये इको टुरिझमची संकल्पना सर्वाधिक पुढे आली. इको टुरिझम एक टिकाऊ पर्यटन आहे, जे निसर्गाशी एकरूप होण्याची संधी तुम्हाला देत असते. कोरोना काळानंतर लोक निसर्गात फिरण्यासाठी बाहेर पडू लागले. तसे इको टुरिझमदेखील वाढत गेले. भारतीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने इको टुरिझमबद्दल जाणून घेऊ या.
इको टुरिझम पर्यटनामध्ये पूर्णपणे एक नवा दृष्टिकोन आहे. पर्यावरणाबाबत त्या ठिकाणाचा इतिहास तेवत ठेवणे आणि निसर्गाची साखळी जोडून ठेवण्यासाठीचा हा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. यातून जे अर्थार्जन होते, तो भाग वेगळाच आहे. वास्तवात, परिस्थितीला धरून पर्यटन करणे आणि स्थानिक लोकांना त्याचा लाभ मिळणे, हे इको टुरिझम म्हणायला हरकत नाही.
बांधवगड (रॉयल बंगाल टायगर आणि झाडे), काजीरंगा राष्ट्रीय उद्यान (मोर आणि कमळ), पेरियार राष्ट्रीय उद्यान (पँथर भाणि शतावरी वनस्पती), रणथंबोर राष्ट्रीय उद्यान (वाघ आणि कडुनिंब झाडे), कान्हा राष्ट्रीय उद्यान (हरण, नीलगाय) असे इको पार्क सांगता येतील.
भारतात विविध भौगोलिक भूमी, अनेक पर्यटनस्थळे केवळ तणावातून मुक्त होण्यासाठीच नव्हे; तर नवी ऊर्जा, नवा उत्साह देण्यासाठी कारणीभूत ठरतात. सर्वात प्राचीन निसर्गाचा आनंद घेणे हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. हिमालय क्षेत्र, केळ, पूर्वोत्तर भारत, अंदमान-निकोबार बेटे, लक्षद्वीप अशी काही अमूल्य ठिकाणे जी तुम्हाला बहुमूल्य संपदेचा आनंद देतात. निसर्गप्रेमींसाठी हा तर अविरत ठेवा आहे.
भारताच्या निसर्गसंपदेत अनेक दुर्मीळ वनस्पती, झाडे, पशु, जीवसंपदा इको टुरिझममधील महत्त्वाचा भाग आहेत. आज भारतात अनेक वन्यजीव अभयारण्य आणि संरक्षण कायदे आहेत. त्यामुळे शिकारीवर बंदी आल्याने बहुतांशी पर्यावरण टिकून राहिले. भारतातील अनेक वन्यजीव, अनेक वनस्पती निसर्ग एकत्र बांधून ठेवण्यास काम करतात. तसेच जागोजागी वृक्षारोपण केले जात आहे, हा परिस्थितीमधील महत्त्वाचा दुवाच आहे. खरंतर, जंगलातून होणार्या शिकारींवर बंदी आणली गेली, त्याचबरोबर पर्यावरणाचे संवर्धन करणार्या अनेक संस्था, संघटना आणि पर्यावरणवादी तज्ज्ञ पुढे येत गेले. त्यांनी पर्यावरण र्हासाच्या विरोधात आवाज उठवला.
भारतात 106 राष्ट्रीय उद्याने, 573 अभयारण्ये आहेत, जे भारतात वन्यजीव संसाधनांची सुरक्षा आणि संरक्षणासाठी काम करतात.
पर्यावरणाचे-निसर्गाचे जितके संवर्धन आणि जतन होईल, तितके निसर्गाच्या जवळ जाता येईल. गोव्यातील गालगी, बागा बीच, ओडिशातील चित्का, सिक्कीम – कांचनगंगा बायोस्फियर रिझर्व्ह, आसाम-काजीरंगा राष्ट्रीय उद्यान, माजुली, नागालँड – जोनसोमा गाव, अरुणाचल प्रदेश – नामधापा राष्ट्रीय उद्यान, लडाख – त्योमोरिवी वेटलँड संरक्षण रिझर्व्ह, आंध्र प्रदेशातील हाडा, मारेदुमिली, कर्नाटक-कुर्ग, नागरर्होळ राष्ट्रीय उद्यान, बांदीपूर नॅशनल पार्क. ही ठिकाणे इको फ्रेंडली म्हणून ओळखली जातात. इको फ्रेंडली टुरिस्ट डेस्टिनेशन्सना तुम्ही भेट देऊ शकता. विविध राज्यपरत्वे तेथील संस्कृतीही बदलत असते, त्यामुळे निसर्गात फिरताना त्या-त्या राज्याची परंपरा आणि संस्कृती तुम्हाला जवळून पाहता येते.
ही भारतातील काही इको पर्यटन स्थळे – कुर्गसारख्या ठिकाणी तर वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते. घनदाट जंगल, धुक्यांनी वेढलेले डोंगर, वन्यजीव अणि मनाला उल्हासित करणारी ठिकाणे एक वेगळाच आनंद देऊन जातात. इको टुरिस्ट ठिकाणांविषयी जितके सांगेल, तेवढे कमीच आहे.
मानवाला निसर्गाने भरभरून संपत्ती दिलीय. त्यामध्ये हिरव्यागार वनस्पती, झाडे आहेत. पर्यावरणातील अगणित पशु, वन्यजीव संपदा आहे. केरळमधील तेनमाला इको फ्रेंडली टुरिझम आवर्जून सांगावे लागेल. वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायजेशनकडून जगातील एक प्रमुख इको-फ्रेंडली प्रोजेक्ट म्हणून तेनमाला निवडले गेले. वळणावळणाचे रस्ते, ब्रॉडवॉक आणि स्कल्पचर गार्डन, दाट जंगले, खासकरून ‘ट्री हट’ मध्ये राहणे तुम्हाला जंगलातील एका नव्या दुनियेत नेते. हा कमालीचा अनुभव फक्त इको टुरिझम देऊ शकतो.
कुर्गमधील वाहती कावेरी नदी इथल्या निसर्गाला समृद्ध बनवते. पुष्पगिरी वन्यजीव अभयारण्य येथील आणखी एक खासियत. इको टुरिझमसाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन म्हटले जाते.
सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक गोव्यातील बोंडला अभयारण्य. निसर्गाची किमया काय असते, याची अनुभूती येथे येते. हिमालयातील पर्वतांच्या कुशीत दडलेले छोटेसे राज्य सिक्कीम होय. अनेक सुंदर घाट, खळखळणारे झरे आणि वाहती नदी सर्व काही सिक्कीमकडे आहे. इथे परदेशी पर्यटकांची गर्दी होत असते.
भारतातील उत्तराखंड तर ‘धरतीचे स्वर्ग’ मानले जाते. देवदेवतांचे धामदेखील यास म्हटले जाते. इथला निसर्ग आपसूक सर्वांना आकर्षित करतो. हिमालयातील ग्लेशियरपासून सुरू होणारी गंगा आणि यमुनेचे दर्शन इथे पवित्र ठरतं.
आपण छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन ‘इको टुरिस्ट’ बनू शकतो आणि पर्यावरणाची सुरक्षा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू शकतो. वरील इको टुरिस्ट ठिकाणांशिवाय तुम्ही कमी विकसित ठिकाणी फिरण्याचा प्लॅन करू शकता. यामुळे तेथील प्रचीन संस्कृती जगासमोर येईल. भारतात ही संकल्पना नवखी असली, तरी अनेक पर्यटक, निसर्गप्रेमी अशा लपलेल्या पर्यटन ठिकाणांच्या (हिडन प्लेस) शोधात असतात. काही लोक इको टुरिझमबद्दल एकदम अनभिज्ञ असतात. पण, खरोखरचं इको टुरिझमला समजणे आणि इतरांनाही त्या प्रती जागरूक करणे, हे गरजेचे आहे.
पण, इको-टुरिझमची वाढती चिंतादेखील आहे. शतकानुशतके, निसर्गाची पूजा आणि संरक्षण नैतिकता भारतीय विचार आणि परंपरेचा एक भाग राहिलेली याहे. याच्या खाणाखुणा भारताच्या प्राचीन संस्कृतीपर्यंत जातात. पण दुःखद बाब अशी, की भौतिक सुविधांसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी निसर्गाचे शोषण होत राहिले आहे. अनेक काँक्रीटच्या इमारती, घरे उभ्या करण्यासाठी समृद्ध वनक्षेत्र आणि जैवविविधतेचा सातत्याने वापर होत चालला आहे. वनसंपदेच्या र्हासामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्रीनहाऊस प्रभाव निर्माण झाला आहे; पण सौभाग्याने आपण निसर्गाच्या प्रती जागरूक झालो आहोत. पर्यावरणाचे संरक्षण करणे, संवर्धन आणि जतन करणे, हे मानवाच्या हाती असल्याने आता निसर्गाप्रती पुन्हा नवी सुरुवात करून परिस्थिती वाढवणे ही आपली मुख्य जबाबदारी ठरणार आहे. मानवाने ते आपले कर्तव्यच आहे, असे समजायला हरकत नाही!
पर्यटनासाठी जाताना आपल्यासोबतचा कचरा निसर्गात उघड्यावर फेकू नये. पवित्र स्थळे, मंदिरे आणि अनेक ऐतिहासिक वास्तूंचा परिसर स्वच्छ ठेवा, ध्वनिप्रदूषण करू नये, जंगलात गाणी वाजवू नयेत. आरडाओरडा, दंगा करू नये. निसर्गात फिरताना अस्वच्छता करू नये- जसे की प्लास्टिक, पॉलिथिन बॅग्ज फेकू नयेत. प्लास्टिक बाटल्या, काचेच्या बाटल्या जंगलात फेकू नयेत. सिगारटचा वापर करू नये. यामुळे जंगलाला आग लागू शकते. कॅम्प साईटवर जेवण बनवताना झाडे तोडून लाकडाचा वापर जळणासाठी करू नये. जंगलात जाताना निसर्गाशी मिळत्याजुळत्या रंगाचे जसे की हिरव्या रंगाचे कपडे घालावेत.
प्रदूषणापासून वाचण्यासाठी आणि निसर्गाशी छेडछाड न होण्यासाठी अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आपण निसर्गात ढवळाढवळ केल्याने पर्यावरणाचे अनेक प्रश्न निर्माण झाले, ते सध्या आपण अनुभवत आहोत. त्यामुळे इको पर्यटनासाठी जाताना आधी ही काळजी घ्या.
Latest Marathi News प्रासंगिक : ‘इको टुरिझम’ची चलती! Brought to You By : Bharat Live News Media.
