तरुणांचे दिशादिग्दर्शन

एखादा नेता आपले व्यक्तिमत्त्व आणि कार्यकर्तृत्वामुळे संपूर्ण देशाला जेव्हा जागे करतो आणि प्रेरणा देतो, तेव्हा देशात परिवर्तनाच्या नांदीची अपेक्षा असते. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वामी विवेकानंद तसेच सुभाषचंद्र बोस यांनी युवकांवर गारूड केले होते. स्वातंत्र्योत्तर काळात लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांती आंदोलनातून इंदिरा गांधी यांची राजवट संपुष्टात आणली. महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्यासारख्या नेत्यांचा पगडा … The post तरुणांचे दिशादिग्दर्शन appeared first on पुढारी.

तरुणांचे दिशादिग्दर्शन

एखादा नेता आपले व्यक्तिमत्त्व आणि कार्यकर्तृत्वामुळे संपूर्ण देशाला जेव्हा जागे करतो आणि प्रेरणा देतो, तेव्हा देशात परिवर्तनाच्या नांदीची अपेक्षा असते. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वामी विवेकानंद तसेच सुभाषचंद्र बोस यांनी युवकांवर गारूड केले होते. स्वातंत्र्योत्तर काळात लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांती आंदोलनातून इंदिरा गांधी यांची राजवट संपुष्टात आणली. महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्यासारख्या नेत्यांचा पगडा देशवासीयांवर होता. आज भारतातील तरुणांची संख्या 35 कोटींवर आहे. तरुणांची संख्या सर्वाधिक असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे.
भारतानंतर चीन, इंडोनेशिया, अमेरिका वगैरेंचा क्रमांक लागतो. नाशिकला 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात तरुणांना जे संदेश दिले, ते अत्यंत मोलाचे आहेत. देशाचा सांस्कृतिक वारसा जपण्यासह विकास हे युवा पिढीचे लक्ष्य असावे, योग आणि आयुर्वेदाचे सदिच्छादूत असणार्‍या युवकांनी आता पौष्टिक तृणधान्याच्या श्री अन्नाचेही सदिच्छादूत व्हावे. तसेच भारतीय उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
उदारीकरण व जागतिकीकरणाच्या काळात आणि सोशल मीडियामुळे, पाश्चात्त्य संस्कृतीचे आकर्षण स्वाभाविकच वाढले आहे. त्यास विरोध करण्याचे काहीच कारण नाही. परंतु, म्हणून आपला आध्यात्मिक वारसा तसेच शरीरसौष्ठव जपणारे योग व आयुर्वेद यांचा विसर पडण्याचे कारण नाही. पाश्चात्त्यांप्रमाणे जंक फूडच्या नादी लागू नये, उलट श्री अन्नाकडे वळा, असे त्यांनी रास्तपणे सुचवले. शेवटी, सांस्कृतिक वारशाच्या आधारशिलेवरच विकासाची इमारत उभी असते, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. पंतप्रधान वयाने तरुण नसले तरी मनाने तरुण आहेत. आज त्यांच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्येही तरुणांची मोठी संख्या आहे. आपल्या आदर्श व्यक्तिमत्त्वामुळे तरुण पिढीवर सुसंस्कार करण्याचेही काम ते करत आहेत, हे महत्त्वाचे. राजकीय नेत्याने समाजाचेही नेतृत्व करणे आवश्यक असते.
त्यामुळेच तरुणांनी अमली पदार्थांपासून दूर राहावे आणि आई-बहिणीवरून अपशब्द वापरू नयेत, असे उपदेशही मोदींनी केले. ते वास्तवाला धरून आहेत. ड्रग्जचा कर्करोग देशाला पोखरतो आहे. ही काळी दुनिया उद्ध्वस्त करण्यात सरकारला यश आलेले नाही. अलीकडील काळात राज्यावर ‘उडता महाराष्ट्र’ अशी टीका होऊ लागली असून, ड्रग्जमाफिया ललित पाटीलच्या प्रकरणामुळे या चर्चेस तोंड फुटले. एवढेच नव्हे, तर अगदी शाळकरी पोरांमध्येही दारूचे आणि ई-सिगारेटचे व्यसन पसरत चालले आहे. स्त्रियांचा सन्मान करण्याऐवजी त्यांच्या नावाने शिवीगाळ देण्याचे प्रकार तर सर्रास रूढ आहेत. आजकाल तर काही राजकीय नेतेही जाहीरपणे शिवराळपणा करू लागले असून, या गोष्टी थांबणे गरजेचे आहे.
ज्या ठिकाणी विरोधकांची गॅरंटी संपते; त्या ठिकाणी मोदींची गॅरंटी सुरू होते, असा दावा अलीकडे मोदी नेहमीच करत असतात आणि त्याचा पुनरुच्चार त्यांनी आपल्या मुंबई दौर्‍यातही केला. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूच्या भूमिपूजनासाठी आले असताना, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने जनतेला हा सेतू पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. आता 18 हजार कोटी रुपयांचा हा ‘अटलसेतू’ प्रकल्प खुला झाला आहे. वांद्रे-वरळी सी लिंक पूर्ण करण्यासाठी तेव्हाच्या सरकारला दहा वर्षे लागली होती, हे खरेच आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर त्यासंदर्भात जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तेव्हा केली होती. मोदीपर्वात पूर्वीप्रमाणे प्रकल्प रखडवले जात नाहीत आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला जातो, हा संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो. देशाची वाटचाल गेल्या दहा वर्षांत संकल्पाकडून सिद्धीकडे होत असल्याचेही सरकारला दाखवून द्यायचे आहे. अटल सेतू हा वांद्रे-वरळी सी लिंकपेक्षा खूपच आधुनिक असून, त्यामुळे मुंबई-कोकण वाहतूक गतिमान होणार आहे आणि कोकणच्या विकासाच्या द़ृष्टीने हे अत्यंत अनुकूल पाऊल आहे. कोकणचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवून तेथे विकास झाल्यास, कोकणी माणसास मुंबईत वा अन्यत्र जाण्याचे कारणच उरणार नाही. केरळमध्ये या प्रकारचा विकास झाला आहे.
नाशिकमध्ये काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी भजनाचा आनंद घेतला आणि त्याचवेळी मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन केले. एवढेच नव्हे, तर स्वतः हातात झाडू घेऊन आपल्या कृतीतून या गोष्टीचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या देशातीलच काय, महाराष्ट्रातील अनेक मंदिरे अस्वच्छ असून, याची आपल्याला लाजही वाटत नाही. शेगावमधील गजानन महाराजांचे मंदिर व अन्य काही मंदिरे जशी स्वच्छ आहेत, तशी इतर देवळे का असू नयेत? महाराष्ट्र दौर्‍यात पंतप्रधानांच्या हस्ते इतरही अनेक प्रकल्पांचे उद्घाटन झाले. आता ‘तिसर्‍या मुंबई’च्या निर्मितीच्या दिशेनेही वाटचाल सुरू झाली आहे. दोन कोटी महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट असल्याची पंतप्रधानांची घोषणा महिलांनाही आश्वासक वाटली असणार.
घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचे अपरिमित नुकसान झाले असून, म्हणूनच अधिकाधिक तरुणांनी राजकारणात यावे, असे आवाहनही मोदी यांनी केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता पार्टी, जनता दल सेक्युलर, शिवसेना अशा अनेक पक्षांमध्ये घराणेशाही आहेच. परंतु, आता भाजपमध्येही अनेक बडी राजकीय घराणी सामील झालेली आहेत. हा धोका या पक्षासमोरही आहे. परंतु, सर्वसाधारणतः आज पैसा वा प्रतिष्ठा नसेल, तर राजकारणात प्रवेश करूनही गुणवत्तेच्या बळावर प्रगती करता येतेच, असे नाही. म्हणूनच हुशार व कर्तबगार तरुण-तरुणी राजकारणात येण्याचे प्रमाण कमी आहे. ज्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत, त्यांना राजकारणात योग्य ती संधीच मिळत नाही. शिवाय राजकीय पक्षांत चापलुसी संस्कृती प्रचलित आहे. या कटू वास्तवाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशात आशा-अपेक्षांचे वारे निर्माण केले आहे. तरुणांचा राजकारणातील सहभाग वाढवणार कसा? हा प्रश्नच आहे. त्याचे कृतिशील उत्तर भाजपसह सर्वच पक्षांना द्यावे लागणार आहे.
Latest Marathi News तरुणांचे दिशादिग्दर्शन Brought to You By : Bharat Live News Media.