तडका : तेवढे आव्हानाचे कामच नाही..!
मानव आकृती असलेला रोबोट 2028 पर्यंत पुण्यामध्ये तयार होण्याची बातमी झळकली आणि या रोबोटविषयी उत्सुकता निर्माण झाली. पुण्यातील डीआरडीओ या नामवंत संस्थेतील शास्त्रज्ञ हा रोबोट तयार करत आहेत. या रोबोटमध्ये मानवी संवेदना आणि त्याची सद्सद्द्विवेकबुद्धी कृत्रिम पद्धतीने तयार करायची कशी, हे त्यांच्यापुढे मोठेच आव्हान आहे म्हणे. तरीही असंख्य सेन्सर वापरून हा रोबोट मानवाप्रमाणे विचार करू लागणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता जगव्यापी होत असताना, पुण्यातील शास्त्रज्ञ रोबोट तयार करणार आहेत आणि हे मोठेच आव्हानाचे काम आहे, असे म्हटले जाते.
रोबोट पुण्यात तयार होत असल्यामुळे हे तेवढे आव्हानाचे काम नाही, असा आमचा दावा आहे. एखादा दावा सादर केल्यानंतर साहजिकच त्याच्या पुष्ट्यर्थ काहीएक युक्तिवाद तयार करणे आवश्यक असतेच. सदरील रोबोट पुण्यामध्ये तयार होत असल्यामुळे साहजिकच पुणेरी वातावरणाचा, पुणेरी संस्कृतीचा आणि पुणेरी बुद्धिमत्तेचा त्याच्यावर नैसर्गिक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तसे पाहता, पुण्यातील मूळचे लोक आता देशाबाहेर किंवा इतरत्र गेलेले आहेत. महाराष्ट्राच्या सर्व भागातील स्थलांतरित होत असलेल्या लोकांची गर्दी पुण्यामध्ये होत आहे. इथल्या पाण्याचा एक गुण आहे. कुठूनही येवो; परंतु इथे आलेला प्रत्येक माणूस पुणेरी होत असतो, याविषयी त्याच्या स्वत:च्या मनात शंका नसते. बुद्धिमत्तेच्या बाबतीत महाराष्ट्रातील हे पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणावे लागेल. येथील प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तींना सातत्याने चोवीस तास बारा महिने ज्ञान वाटत असतो, त्यामुळे रोबोटलापण वेगळी अशी काही बुद्धी देण्याची गरज पडेल, असं वाटत नाही. त्याला केवळ पुण्यात काही दिवस वास्तव्य करू द्यावे. एवढे झाले की, त्याच्यामध्ये पुणेरी गुण आपोआप येण्यास सुरुवात होईल.
हा रोबोट तयार करणार्यांना त्याला बुद्धिमत्ता कशी प्रदान करावी, हा तज्ज्ञांच्या समोर मोठा पेच आहे म्हणे. पुण्यात तयार झाला आणि सहा महिने त्याचे वास्तव्य इथे झाले की, त्याच्या मेंदूत आपोआप प्रक्रिया होऊन बुद्धिमत्ता येण्यास सुरुवात येईल. त्याचे बोलणे, चालणे, वागणे, कपडे आणि पेहराव बदलून जाईल. मूळ पुणेकरांचे गुण दिसण्यास सुरुवात होईल. हे दोन गुण कोणते? असा प्रश्न तुम्हास पडला असेल. अहो, सोपे आहे. पहिला गुण म्हणजे स्वतःला अलौकिक बुद्धिमान समजून अविरत ज्ञान वाटप करत राहणे. दुसरा गुण म्हणजे कमीत कमी शब्दात समोरच्याचा अपमान करणे. हे त्या रोबोटमध्ये आपोआप येईल आणि मग त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान करण्याची गरजच भासणार नाही. रोबोट तयार करणार्या शास्त्रज्ञ मंडळींनी आमचा सल्ला जरूर विचारात घ्यावा, ही विनंती.
सध्या एआयचे जग आहे, त्यामुळे माणसाच्या जीवनात त्याचा चांगला वापर जरूर होण्याची गरज आहे. पुणेकर शास्त्रज्ञ तेथील वागण्याचे आणि बोलण्याचे संस्कार नक्कीच त्या रोबोटमध्ये घालतील. पुणेकर नेहमीच नावीन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या जिज्ञासूवृत्तीतून ते रोबोटमध्ये अनेक गुण घालतील आणि त्याला त्याप्रमाणे वागायलाही सांगतील. मग काय, रोबोट अगदी पुणेकर झाल्यावाचून राहणार नाही. पण राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी अन्य शहरांतीलही गुण शास्त्रज्ञांनी घालावे, हे याठिकाणी नमूद करावे लागेल. तो रोबोट पुणेकरांप्रमाणेच वागल्यास अन्य लोकांची अडचण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्यांनी रोबोट तयार करताना सर्व बाबींचा विचार करावा, हे याठिकाणी नमूद करावसे वाटते!
Latest Marathi News तडका : तेवढे आव्हानाचे कामच नाही..! Brought to You By : Bharat Live News Media.