नार्वेकरांच्या फोटोला जोडे मारो ; घोषणाबाजी करत केला निषेध

पाथर्डी तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवसेना आमदारांच्या अपात्रेबाबत विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी सुनावणी करून चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याच्या निषेधार्थ नार्वेकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे शहरातील नाईक चौकात करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी, तालुकाध्यक्ष भगवान दराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी भाऊसाहेब धस, नवनाथ चव्हाण, भाऊसाहेब निमसे, रामकिसन भिसे, अंकुश आव्हाड, केशव खेडकर, बबन शेळके, चंद्रकांत शेळके, दत्तू कोरडे, भागीनाथ गवळी, नवनाथ वाघ, गोलू भाबड, कृष्णा पालवे, किशोर गाडेकर, राजेंद्र खेडकर, रवी औटी, अजिनाथ भापकर, रवी मोहिते आदी शिवसैनिक उपस्थित होते. लोकशाहीची हत्या करणार्या सरकारचा निषेध असो, हुकूमशाही पद्धतीने निर्णय करणार्या नार्वेकरांचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी करत नार्वेकरांसह सत्ताधार्यांचा जाहीर निषेध केला.
या वळी राजेंद्र दळवी म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेविरोधात आमदार अपात्रतेचा निकाल देऊन केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजप सरकारने अधिकार्यांवर दबाव तंत्राचा वापर करून आपल्याला वाटेल तसा निकाल लावून घेतला आहे.
देशाची वाटचाल ही हुकूमशाही राजवटीकडे चालू आहे. देशात एक अस्थिर राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. मनमानी पद्धतीचे राजकारण होत असून, केंद्र सरकारविरोधात आवाज उठवणार्या विरोधी पक्षाच्या नेते अथवा लोकप्रतिनिधींना ईडीची कारवाई करून त्यांना संपवण्याचे कट कारस्थान रचले जात आहे. त्यांच्या विरोधात आवाज कोणीही उठवू नये अशी परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली आहे. या सर्व बाबींमुळे या देशात लोकशाहीची हत्या झाल्याचे दळवी म्हणाले.
दराडे म्हणाले की, केंद्रातील हे सरकार दबाव तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करून चुकीच्या पद्धतीने विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, शिवसैनिक संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. यापुढेही सत्ताधार्यांविरोधात संघर्ष सुरू राहील. अशा चुकीच्या पद्धतीने निकाल देऊन लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम झाल्याचे दराडे म्हणाले.
Latest Marathi News नार्वेकरांच्या फोटोला जोडे मारो ; घोषणाबाजी करत केला निषेध Brought to You By : Bharat Live News Media.
