Pune : तळेगाव ढमढेरेत वाहतूक कोंडीसह अपघात वाढले

तळेगाव ढमढेरे : Bharat Live News Media वृत्तसेवा : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) परिसरात शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर तसेच पुणे-अहमदनगर महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रेलरच्या साहाय्याने धोकादायक व बेशिस्तपणे ऊसवाहतूक होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबर अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अशा बेशिस्त व धोकादायक ऊसवाहतूक करणार्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सध्या साखर कारखाने व गुर्हाळे सुरू असल्याने ऊसवाहतूक वाढली आहे. उसाची वाहतूक बैलगाड्या, ट्रॅक्टर-ट्रेलर व ट्रकमधून होत आहे. यापैकी ट्रेलरच्या साहाय्याने उसाची सर्वाधिक वाहतूक होत आहे. मात्र, काही बेशिस्त व धोकादायकपणे ऊस वाहतूक करणार्या वाहनचालकांमुळे पुणे-अहमदनगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. काही ट्रॅक्टरचालक हे तीन ट्रेलर जोडून ऊस वाहतूक करीत आहेत, तर प्रमाणापेक्षा जास्त ऊसवाहतूक होत आहे. त्यामुळे ट्रेलर पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहतूक खोळंबून राहते. दुचाकीस्वारांना तर ट्रॅक्टर-ट्रेलरजवळून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी ऊस व उसाच्या मोळ्या पडलेल्या असतात. त्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढत आहे.
रात्रीच्या वेळी तर वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश नवीन ट्रेलरला नंबरप्लेट नाहीत तसेच हे ट्रॅक्टरचालक मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डर चालू ठेवत आहेत. काहीवेळा बेदरकारपणे वेगाने वाहने पळविली जात आहेत. अशा बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे बनले आहे, असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.
Latest Marathi News Pune : तळेगाव ढमढेरेत वाहतूक कोंडीसह अपघात वाढले Brought to You By : Bharat Live News Media.
