निरा-बारामती रस्त्यावरील प्रवास झाला सुखकर

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वारंवार देखभाल आणि दुरुस्ती होत असल्याने निरा- बारामती या राज्य मार्गावरील प्रवास सुखकर झाला आहे. यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, या रस्त्यावर प्रमाणापेक्षा अधिक गतिरोधक टाकण्यात आले आहेत, शिवाय ते नियमानुसार नाहीत. तरीही रस्ते चांगले झाल्याने प्रवास करताना वेळेची बचत होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नुकताच पणदरे ते कोर्हाळे या रस्त्यावर डांबरीकरण झाले. रस्त्यावरील खड्डे बुजले गेले. पर्यायाने प्रवास सुखकर होऊन प्रवाशांचा किंमती वेळ वाचू लागला आहे. या मार्गावरील पणदरे, खामगळपाटी, शारदानगर, करंजेपूल, निंबुत या गावातील पुलांची कामे पूर्ण झाली आहेत.
करंजेपूल येथील पुलाचे काम रखडले असून ते तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. निरा-बारामती हा राज्य मार्ग सर्वाधिक वाहतुकीचा आहे. या रस्त्यावर वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात ताण आहे. सोमेश्वर आणि माळेगाव सहकारी साखर कारखाना याच मार्गावर असल्याने ऊस वाहतूकही याच मार्गावरून सुरू आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दुरुस्ती करण्यात येत आहे. याशिवाय झाडांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. साईडपट्ट्या भरून धोकादायक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.
दै. ‘Bharat Live News Media’चा चार वर्षांपासून पाठपुरावा
याबाबत दै. ‘Bharat Live News Media’ने गेल्या चार वर्षांपासून सतत वृत्त प्रकाशित करत या रस्त्याच्या समस्या मांडल्या होत्या. ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने या मार्गावरून प्रवास करत असतात. ठिकठिकाणी रस्त्यांची चाळण झाल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. यामुळे जड वाहनांनाही प्रवास सुखकर बनला आहे.
Latest Marathi News निरा-बारामती रस्त्यावरील प्रवास झाला सुखकर Brought to You By : Bharat Live News Media.
