महाराष्ट्रावरील अन्यायासाठी कोणते वेगळे कलम आहे? : आदित्य ठाकरे

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्र व राज्य सरकारकडून महाराष्ट्रावर सतत अन्याय केला जात आहे. देशात कुठल्या राज्यावर अन्याय करायचा असेल तर तो केवळ महाराष्ट्रावरच केला जातो, असा आरोप करत जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवले असेल, पण महाराष्ट्रावर अन्याय करणारे कोणते वेगळे कलम बसले आहे का, असा सवाल शिवसेना नेते (ठाकरे गट), युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केला.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गिरगावात झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात आदित्य बोलत होते. 2024 ची वाट आपण अनेक वर्ष पाहतोय. गेल्या दोन वर्षांपासून मुंबई, महाराष्ट्र वाट पाहतेय. हे वर्ष हे आपलेच असणार, आपणच गाजवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संपूर्ण देशाचे लक्ष या दक्षिण मुंबईवर असते. कारण हीच मुंबई, दक्षिण मुंबई देशाला चालवत आलेली आहे, देशाला पुढे नेत आलेली आहे. पण ही मुंबई देशाला चालवते ही महाराष्ट्राचे विरोधक असतील किंवा शिंदे सरकार यांची पोटदुखी आहे. त्यांची ही पोटदुखी आपल्याला मोडून काढायची आहे, असे आवाहनही त्यांनी केले.दक्षिण मुंबईत अनेक बँका, विमा कंपन्या, एअर इंडिया आदी सरकारी कार्यालयांची मुख्यालये होती. गेल्या दहा वर्षात ही मुख्यालये कुठे गेलीत, असा सवाल उपस्थित करत आदित्य म्हणाले, गेल्या दहा वर्षात मुंबईतून एकेक कार्यालय कळत-नकळत हलवले गेले. आता आपल्याला कळत असेल की हे जे सरकार आपल्या डोक्यावर बसवले गेले आहे ते महाराष्ट्रद्वेष्टे आहे. सध्या जो काही अन्याय होतोय तो महाराष्ट्रावर होतोय. यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडून महाराष्ट्रात बिल्डर खोके सरकार बसवले आहे, असा आरोप त्यांनी केला.
Latest Marathi News महाराष्ट्रावरील अन्यायासाठी कोणते वेगळे कलम आहे? : आदित्य ठाकरे Brought to You By : Bharat Live News Media.
