नाशिककरांनी सोडला नि:श्वास; दोन्ही बिबटे जेरबंद
नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा-दिवाळीनंतर सर्वत्र शांतता असतानाच शुक्रवारी (दि. 17) सकाळी सिडकोतील सावतानगर आणि गोविंदनगर भागात बिबट्याचा मुक्तसंचार आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भर वस्तीत दाखल झालेल्या या जोडीला रेस्क्यू करण्यासाठी वनविभाग व पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर दोन्ही बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळाले. मात्र, नागरिकांनी केलेली गर्दी आणि कर्मचाऱ्यांची पळापळ या सगळ्या गोंधळात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला.
सावतानगर येथील विठ्ठल मंदिराजवळ गोपी विठ्ठलकर यांच्या घराबाहेर पहाटे कुंत्री भुकत असल्याने विठ्ठलकर यांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, त्यांना घरासमोरून बिबट्या जाताना त्यात दिसला. त्यांनी माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना ही माहिती दिली. त्यातच बडगुजर यांच्या सावतानगर येथील संपर्क कार्यालयाजवळील सूर्योदय कॉलनीतही बिबट्याचे दर्शन झाल्याचे समोर आले. काहीच वेळात फिरायला जाणाऱ्यांनाही बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे काही क्षणांत परिसरात बिबट्या आल्याची वार्ता परिसरात पसरली. त्यात बिबट्याने आपला मोर्चा जीएसटी कार्यालय आवारात वळविला. बडगुजर यांनी कळविल्यावर वनविभागाचे पथक व पोलिसांनी धाव घेतली. यावेळी बिबट्याने आपली जागा सातत्याने बदलत परिसरात फिरणे सुरूच ठेवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. यावेळी अभ्यासिका व जलकुंभ परिसरात व त्यानंतर प्रताप विहारपासून पुन्हा रायगड चौकातील विठ्ठल मंदिर परिसरात बिबट्या आला. अखेर एका बोळीत पलंगाखाली बसल्यावर वनविभागाच्या पथकाने 10.30 च्या सुमारास इंजेक्शन मारत त्याला बेशुद्ध करून जेरबंद केले.
गोविदनगरला बिबट्या जेरबंद
येथील अशोक प्राइडमधील डॉ. सुशील अहिरे यांच्या बेडरूममध्ये वनविभागाच्या पथकाने बिबट्याला तीन वेळा इंजेक्शन देऊन सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर जेरबंद केले. यावर परिसरातील नागरिकांनी टाळ्या वाजवून वनविभागाचे आभार मानले.
गोविंदनगर येथे पहाटे 6 च्या सुमारास जॉगिंग ट्रॅक परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर 9.30 च्या सुमारास अशोक प्राइड सोसायटीत मुख्य प्रवेशद्वारातून बिबट्याने प्रवेश केला. यावेळी प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक संजय बोराडे यांना बिबट्या दिसला. विशेष म्हणजे येथे बिबट्याने तीनवेळा डरकाळी फोडली. त्यामुळे जवळच पार्किंगमध्ये गाडी धुणाऱ्या मुलांनी बिबट्याला पाहिल्याने त्यांनी ओरडून घरात जात दरवाजा बंद केला. त्यानंतर बिबट्याने सी-विंग इमारतीत तळमजल्यावर डॉ. सुशील अहिरे यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने घरात प्रवेश केला. थेट बेडरूमधील कपाटावर ठिय्या मांडला. डॉ. अहिरे हे बाहेर फिरायला गेले होते. ते 9.30 ला घरी आले मात्र, कुत्रा बेडरूमकडे जाणारा जिना चढत नसल्याने त्यांचे लक्ष घरात गेले असता घरात एका बातूला पत्नी डॉ. प्रतिभा या काम करत होत्या तर दुसऱ्या बाजूला बिबट्या बेडरूममध्ये कपाटावर बसलेला दिसून आला. यावेळी त्यांनी अलगद बेडरूमचा दरवाजा ओढून घेत कडी लावली. घटनेची माहिती वनविभाग व मुंबई नाका पोलिसांनी दिल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक पत्की हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. तसेच वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्क, सहायक उपवनसंरक्षक अनिल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन बिरारीस, वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भालेराव आदींनी धाव घेत खिडकीद्वारे बिबट्याला इंजेक्शन देण्याचे प्रयत्न केला मात्र, दोन दोन इजेक्शन अयशस्वी ठरले. अखेर तिसरे इंजेक्शन बिबट्याला लागल्यावर तो बेशुद्ध झाला. त्यामुळे तत्काळ बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
बेडरूमला छीद्र पाडून मारले इंजेक्शन
खिडकीद्वारे मारलेले दोन अयशस्वी झाल्याने वनविभागाचे कर्मचारी वैभव भोगले, अभिजीत महाले, अयुश पाटील, डाॅ. हेमराज सुखवाल, दर्शन बनकर यांनी बेडरूममध्ये बिबट्या दिसेल अशा ठिकाणी छीद्र पाडून तिसरे इंजेक्शन मारले. ते बिबट्याला लागल्याने सुमारे पावणेतीन तासांच्या परिश्रमानंतर बिबट्या जेरबंद करण्यात यश आले. त्यामुळे उपस्थितांनी टाळ्या वाजवून वनविभागाचे आभार मानले.
मी 9.30 च्या सुमारास बेडरूममध्ये काम करत होते. त्यावेळी पती डॉ. अहिरे माझ्याजवळ आले व त्यांनी शेजारच्या रूममधे बिबट्या असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही सर्व जण खूप घाबरले होताे.
– डाॅ. प्रतिभा अहिरे
आमच्या कुत्र्यावर एकदा आसाम राज्यात असताना बिबट्याने हल्ला केला होता. कदाचित बिबट्याच्या वासाने कुत्र्याला घरात बिबट्या असल्याचे समजले असावे.
– डॉ. सुशिल अहिरे
सुमारे 9.30 च्या सुमारास सोसायटीत बिबट्या आला आहे. दरवाजा बंद करा असा आवाज बाहेरून आल्यानंतर आम्ही लगेच दरवाजे बंद केले.
– आर्य शिसव, स्थानिक रहिवासी
अशोक प्राइड येथील मुख्य प्रवेशद्वार येथून बिबट्याने सोसायटीत प्रवेश केला. यावेळी त्याने तीनवेळा डरकाळी फोडली. त्यामुळे सर्वांना सावध केले.
– संजय बोराडे, सुरक्षारक्षक
सावतानगरमध्ये बिबट्या आल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्यामुळे तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देत व्हिडिओ पाठविला. त्यानंतर काही तासांमध्ये बिबट्याला जेरबंद केले. नागरिकांनी दाखवलेली सतर्कता व वनविभागाच्या चपळाईमुळे अनर्थ टळला.
-सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे बडगुजर यांना कळविले. त्यांनी तत्काळ सूत्रे हलविल्याने बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे वन विभाग व बडगुजर यांचे आभारी आहोत.
– रेखा राहणे, सावतानगर, सिडको
दोन तासांच्या आत बिबट्याला बेशुद्ध करण्यास यश आले. 15 मिनिटांनी त्याला जाग आली. सध्या बिबट्या वनविभागाच्या ताब्यात असून त्याला गंगापूर रोड येथील नर्सरीमध्ये ठेवण्यात येईल. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
– अनिल अहिरराव, वनपरिमंडळ अधिकारी
वनविभागाला आत्याधुनिक सोयी सुविधांची गरज आहे. बिबट्या पकडण्यासाठी 360 अंश फिरणारा कॅमेरासुद्धा उपलब्ध नव्हता. वनविभागाला आधुनिक सुविधांची गरज आहे.
– अजिंक्य गिते, सामाजिक कार्यकर्ते,
हेही वाचा :
ओबीसीतून मराठा आरक्षण मिळू देणार नाही?: छगन भुजबळ
‘तो आवाज माझ्या पुतण्याचा वाटत होता’; AI voice च्या मदतीने महिलेची १.४ लाखांची फसवणूक
कल्याण डोंबिवलीत महिलाराज, केडीएमसीच्या आयुक्तपदी डॉ.इंदुमती जाखड यांची नियुक्ती
The post नाशिककरांनी सोडला नि:श्वास; दोन्ही बिबटे जेरबंद appeared first on पुढारी.
नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा-दिवाळीनंतर सर्वत्र शांतता असतानाच शुक्रवारी (दि. 17) सकाळी सिडकोतील सावतानगर आणि गोविंदनगर भागात बिबट्याचा मुक्तसंचार आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भर वस्तीत दाखल झालेल्या या जोडीला रेस्क्यू करण्यासाठी वनविभाग व पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर दोन्ही बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळाले. मात्र, नागरिकांनी केलेली गर्दी आणि कर्मचाऱ्यांची पळापळ या सगळ्या गोंधळात …
The post नाशिककरांनी सोडला नि:श्वास; दोन्ही बिबटे जेरबंद appeared first on पुढारी.