वाकड परिसरातून सर्वाधिक 100 कोटी कर भरणा
पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील वाकड विभागीय कर संकलन कार्यालय परिसरातील मिळकतधारकांनी तब्बल 100 कोटींचा मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. त्यातील 78 कोटी 32 लाख रुपये ऑनलाइन भरले गेले आहेत. थेरगाव कार्यालय भागांतील नागरिकांनी 59 कोटी तर, सांगवी कार्यालयात 52 कोटींचा भरणा झाला आहे. भोसरी व चिखली कार्यालयात प्रत्येकी 50 कोटी जमा झाले आहेत.
शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा 6 लाख 7 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून महापालिकेचा कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. या विभागाच्या वतीने विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ताधारकांना नोटिसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे अशा मोहिमांच्या माध्यमातून कर जमा केला जात आहे. तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाद्वारे जनजागृती, महत्त्वाच्या चौकांत होर्डिंग्ज, रिल्स स्पर्धा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून कर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. या विविध उपक्रमांना यश येत असून महापालिकेच्या कर संकलन विभागाने आतापर्यंत 648 कोटी 71 लाख 65 हजार रुपयांचा कर जमा केला आहे.
वाकड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आयटी अभियंता राहतात. त्या वाकड विभागातून आतापर्यंत सर्वाधिक मिळकतकर जमा झाला आहे. आयटीएन्स महापालिकेचा कर भरण्यातही टॉप असल्याचे दिसून आले आहे. वाकड विभागामध्ये निवासी मालमत्ता 47 हजार 648, बिगरनिवासी 3475, मिश्र 198, औद्योगिक 1, मोकळ्या जमिनी 459 अशा 51 हजारांहून अधिक मिळकती आहेत. यामधील वाकड विभागातून सर्वाधिक 100 कोटी 57 लाख रुपयांचा कर महापालिकेमध्ये झाला आहे.
दरम्यान, शहरातील तब्बल 2 लाख 66 हजार नागरिकांनी घरबसल्या ऑनलाइन कर भरण्याला पसंती दिली आहे. त्यापैकी 44 हजार 935 नागरिक हे वाकड विभागातील आहेत. त्यांनी 78 कोटी 32 लाख रुपये ऑनलाइन भरले आहेत. तर रोख स्वरूपात शहरातील 69 हजार 618 जणांनी 85 कोटी 76 लाख 911 रुपये जमा केले आहेत. त्यापैकी वाकड विभागातून रोखीने फक्त 3 हजार जणांनी 5 कोटी 76 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
कर भरण्यात वाकड अव्वल
शहरातील वाकड विभागीय कर संकलन कार्यालयात सन 2023-24 या आर्थिक वर्षात अताापर्यंत सर्वाधिक 100 कोटी रुपयांचा मिळकतकराचा भरणा झाला आहे. त्यामध्ये ऑनलाइन कर भरणार्या नागरिकांची संख्या जास्त आहे. तर रोखीने पैसे भरणार्या नागरिकांची संख्या कमी आहे. तसेच आतापर्यंत शहरातील एकूण 17 विभागांतून 648 कोटी रुपयांचा भरणा झाला आहे, असे कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा
Pimpri Crime News : परस्पर कर्ज काढणार्या ठगाला केली अटक
Nashik News : पालकमंत्री शुक्रवारी घेणार पीकविम्याचा आढावा
बारामतीचा आगामी खासदार भाजपचाच ! : अंकिता पाटील
The post वाकड परिसरातून सर्वाधिक 100 कोटी कर भरणा appeared first on Bharat Live News Media.