Pune : चांडोली बुद्रुकच्या वेताळमळ्यात 4 बिबट्यांचा वावर
मंचर : Bharat Live News Media वृत्तसेवा : चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील वेताळमळ्यामध्ये 4 बिबट्यांचा वावर दिसून आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तातडीने वन विभागाने या भागात पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप थोरात व सरपंच दत्तात्रय केदार यांनी केली आहे. ऊसतोड सुरू झाल्यामुळे बिबटे सैरभैर झाले आहेत. वेताळमळ्यातील वेताळ मंदिराजवळ अनिल थोरात व प्रतीक थोरात हे वाहनातून कळंबहून चांडोलीकडे येत असताना दोन बिबटे रस्त्यावर बसलेले त्यांना दिसले. त्यांनी वाहन थांबवून हॉर्न वाजवल्यानंतर ते बिबटे उसाच्या शेतात निघून गेले. पुढे गेल्यावर वेताळमळ्यातील वेशीजवळ परत दोन बिबटे रस्ता ओलांडताना त्यांना आढळून आले, त्यामुळे एकूण 4 बिबटे परिसरामध्ये फिरत आहेत.
यापूर्वीदेखील बिबट्यांनी दुचाकीस्वारांवर हल्ले करून जखमी केले आहे. दोनच दिवसांपूर्वी कळंब येथे माळीमळ्यामध्ये एका बिबट्याला पिंजर्यात पकडण्यात वन विभागाला यश आले; परंतु राहिलेले बिबटे हे आता चांडोली हद्दीमध्ये ठाण मांडून आहेत. शेतकर्यांना रात्रीच्या वेळी पिकाला पाणी द्यावे लागते. शेतकर्यांवर हल्ला होण्याच्या अगोदर वन विभागाने त्वरित पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गोविंद थोरात यांनी केली.
हे ही वाचा :
कोकण रेल्वेकडून गुरूवारी मडगाव ते कुमटा जंक्शन दरम्यान मेगाब्लॉक
Pune Crime News : कोंढवा पोलिसांनी पकडली 7 पिस्तुले 24 काडतुसे
The post Pune : चांडोली बुद्रुकच्या वेताळमळ्यात 4 बिबट्यांचा वावर appeared first on Bharat Live News Media.