सोलर कंपनीत स्फोट प्रकरणावरून विधानसभेत विरोधक आक्रमक
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत रविवारी स्फोट होऊन पॅकेजिंग युनिटची इमारत उध्वस्त झाली. ६ महिला, ३ पुरुष अशा ९ कामगारांच्या मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज सकाळी विधानसभेत व नंतर विधानपरिषदेत उमटले. गंभीर घटना, व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा असल्याने कामकाज बाजुला सारुन या मुद्यावर चर्चेची मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली.
मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी, या घटनेवर सभागृहात सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. काँग्रेसचे नाना पटोले, माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांनीही चर्चेची मागणी केली. मात्र, ती फेटाळून लावत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या मुद्यावर निवेदन करण्याचे निर्देश सरकारला दिले. दरम्यान, विरोधकांनी सरकारला गरिबांच्या, तरुणांच्या जीवाचे मोल नाही, १०-११ हजार रुपयांवर कंत्राटी कामगार ठेवत जोखमीची कामे करून घेतली जातात, असा आरोप केला. या मुद्यावर आक्रमक होत विरोधकांनी अखेर विधानसभेत सभात्याग केला.
विधानसभेत कामकाज सुरु झाल्यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सोलर एक्स्प्लोसिव्हमधील घटना अतिशय गंभीर असून त्यावर सभागृहात चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. कंपनीत कंत्राटदारांकडून पाठविलेल्या अकुशल कामगारांना स्फोटके हाताळावी लागतात, असा आरोप त्यांनी केला. या कामगारांना अतिशय तुटपुंजे वेतन दिले जाते, असेही त्यांनी सांगितले. सरकारने या घटनेची जबाबदारी म्हणून कामगारांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. आमदार नाना पटोले यांनीही हा मुद्दा उपस्थित करुन चर्चेची मागणी केली. दरम्यान, सरकारने या मुद्यावर सोमवारी कामकाज संपण्यापूर्वी निवेदन करावे, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेत. दरम्यान, याने विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणबाजी करीत विधानसभेत सभात्याग केला. दरम्यान, विधानपरिषदेतही स्थगन प्रस्तावाच्या सूचनेवरून विरोधकांनी सरकारला घेरले, आता मंगळवारी चर्चा होणार आहे.
हेही वाचा :
१३८ वर्षांपूर्वीच्या कायद्यात होणार बदल, ‘दूरसंचार विधेयक’ लोकसभेत सादर
‘मेरी मर्जी…’ महानगरपालिका निवडणुकांबाबत राज ठाकरे असे का म्हणाले?
मराठा आरक्षणासाठी सर्व खासदारांनी दिल्लीत आवाज उठवावा : छत्रपती संभाजीराजे
The post सोलर कंपनीत स्फोट प्रकरणावरून विधानसभेत विरोधक आक्रमक appeared first on Bharat Live News Media.