’गुन्हेगारी पॅटर्न’द्वारे गुन्हेगारी संपवणार : पोलिस आयुक्त रितेश कुमार
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : दिवसेंदिवस पुण्यातील गुन्हेगारीचा पॅटर्न बदलतो आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगरचा गुन्हेगारीचा पॅटर्न सारखा आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) काम करत असताना, त्याचे अनेकदा मी विश्लेषण केले आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे गुन्हेगारीचा पॅटर्न बदलत आहे त्याप्रमाणे पुणे पोलिस काम करून ती मोडीत काढण्यासाठी प्रयत्नशील असतील, असे पोलिस आयुक्त रितेशकुमार म्हणाले.
पुणे शहर पोलिस आयुक्त म्हणून रितेशकुमार यांना एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर या वेळी उपस्थित होते. पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, गुन्हेगारी ही 100 टक्के संपणारी नाही. गुन्हे घडूच नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तक्रारदारांची तत्काळ तक्रार घेण्यात येत आहे.
प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे थांबवू शकलो. अनेक योजनांची अंलबजावणी करण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक कारवाईमुळे भविष्यात घडणार्या अनेक गुन्ह्यांना आळा घालता येऊ शकतो. यात अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत, त्यांच्यासाठी परिवर्तनसारख्या योजना आणल्या आहेत. बिट मार्शल, दामिनी पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच ‘मायसेल्फ पुणे’चा प्रभावी वापर करण्यात येत आहे, मागच्या 5 ते 7 वर्षांचा विचार केला तर आर्थिक, सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी वाढत आहेत. यासाठी लागणारे मनुष्यबळ वाढविण्यात येत आहे.
यात आवड असणार्या अधिकार्यांना, कर्मचार्यांना आर्थिक गुन्हे शाखेत घेण्यात येणार असल्याचे रितेश कुमार यांनी सांगितले. मुंबई बरोबरच पुण्यालासुद्धा सतत दहशतवादी कारवाईचा धोका असतो. यामुळे याकडेसुद्धा बारकाईने लक्ष ठेवावे असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
आयुक्तालयाला नवीन इमारत
शहराचा वाढलेला विस्तार, पोलिस ठाण्यांची वाढलेली संख्या आणि कामाचा भार, यामुळे पुणे पोलिस आयुक्तालयासाठी सध्याची इमारत अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर सध्याचे आयुक्तालय आहे, त्याच जागी पुणे पोलिस आयुक्तालयासाठी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. मात्र, अद्याप त्याची सर्व प्रक्रिया बाकी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार, हे निश्चित नाही.
हेही वाचा
मंजूर शिफारशीची अंमलबजावणी त्वरित करू : गुलाबराव पाटील
टेकइन्फो : अंतराळ स्थानकाची पंचविशी
Pune News : पुस्तक महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल
The post ’गुन्हेगारी पॅटर्न’द्वारे गुन्हेगारी संपवणार : पोलिस आयुक्त रितेश कुमार appeared first on Bharat Live News Media.