मिरजेच्या अभियंत्यांनी बांधला उड्डाण पूल
जालिंदर हुलवान
मिरज : मिरज शहरातून कोल्हापूर जिल्ह्याला कृष्णाघाट ते अर्जुनवाडमार्गे जोडणारा रेल्वेचा उड्डाण पूल रविवारपासून (दि. 17 डिसेंबर 2023) प्रवासासाठी खुला होणार आहे. या रेल्वे उड्डाण पुलाची गेल्या 20 वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. मिरज शहरामध्ये उपचारासाठी येणार्या रुग्णांनाही त्याचा फायदा होणार आहे. हा पूल मिरजेच्या कौलगुड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक चैैतन्य सुहास कौलगुड व वैभव सुहास कौलगुड यांनी बांधला आहे.
मिरज शहरातून कोल्हापूर जिल्ह्याकडे जाण्यासाठी अंकली मार्गे व कृष्णाघाट, अर्जुनवाडमार्गे जाण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. मिरजेच्या शास्त्री चौकातून व उत्तमनगर परिसराजवळून या दोन्ही मार्गाकडे जाता येते. रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मिरज तालुक्याच्या हद्दीमध्ये अंकली ते तानंग फाट्याजवळ बायपास रस्ता काढण्यात आला आहे. हा रस्ता गेल्या 7 महिन्यांपासून प्रवासासाठी खुला झाला आहे. हा रस्ता खुला झाल्यामुळे मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून सोलापूर आणि त्यापुढे जाणार्या वाहनांची संख्या खूप कमी झाली आहे. बायपास राष्ट्रीय महामार्गावरून वाहने नेण्यास वाहनधारकांकडून पसंती दिली जात आहे. मिरज-अंकली रस्त्यावरील रजपूत मंगल कार्यालयापासून ते पुढे टाकळीपासून पुढे उड्डाण पूल उभारण्यात आला आहे.
मिरजेतील शास्त्री चौकापासून कृष्णाघाट, अर्जुनवाड, शिरोळ, चिंचवाड, जयसिंगपूरकडे जाता येते. मिरजेहून या गावांकडे ये-जा करणार्यांची संख्या मोठी आहे. याच मार्गावर शिरोळच्या पुढे नृसिंहवाडी हे तीर्थक्षेत्र आहे. या नृसिंहवाडी तीर्थक्षेत्राकडे जाणार्या भाविकांचीही संख्या मोठी आहे. मार्गावर मिरज ते कृष्णा घाट या अंतरावर सोलापूरकडे जाणारा रेल्वेमार्ग आहे. या रेल्वे मार्गामुळे वाहनधारकांना व भाविकांना ये-जा करण्यासाठी नेहमी अडथळा निर्माण होत होता. या मार्गावर रेल्वे मार्गामुळे अपघातही होत होते. या मार्गावर रेल्वे उड्डाण पूल करण्याची मागणी मिरज शहरासह या भागातील नागरिकांनी केली होती. गेल्या वीस वर्षांपासून नागरिकांनी ही मागणी केली होती. या रेल्वे उड्डाण पुलासाठी एक वर्षापूर्वी काम सुरू झाले. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) हा महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम आहे. हे काम आता पूर्ण झाले आहे.
मिरज ते अर्जुनवाड रस्त्यावर हा उड्डाण पूल पूर्ण झाल्यावर शिरोळ आणि जयसिंगपूरकडे जाणार्या मिरज शहरातील स्थानिक व इतर प्रवाशांना फाटकमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाचा अनुभव घेता येईल. वैद्यकीय आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिक त्वरित पोहोचू शकतील. या उड्डाण पुलामुळे स्थानिक व्यवसायाच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
विशेष रंगीत एलईडी थीम लाइटिंग…
मिरज जंक्शन आणि विजयनगर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्रमांक 465 येथे हा उड्डाण पूल उभारण्यात आला आहे. या उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या दोनपदरी पुलाची एकूण लांबी 750 मीटर आहे. महारेलच्या या बांधकामाचे एक महत्त्वपूर्ण काम म्हणजे, रेल्वेच्या भागावर सर्व 5 स्टील गर्डर्सचे लॉन्चिंग अवघ्या 2 तास 50 मिनिटांत पूर्ण केले होते. उड्डाण पुलाच्या सुशोभिकरणासाठी कमानीतील पथदिव्यांमध्ये एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. रिमोट कंट्रोलद्वारे विशेष रंगीत एलईडी थीम लाइटिंग वापरण्यात आली आहे.
मिरजेच्या सौंदर्यातही पडणार भर…
यापुर्वी प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर सुहास कौलगुड यांनी मिरजेतून वड्डी म्हैसाळकडे जाणारा पूल 2000 मध्ये बांधला होता. त्यानंतर त्यांचे पुत्र चैतन्य व वैभव यांंनी सीएस कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून आता हा मिरजेतील दुसरा पूल बांधला आहे. हा पूल मिरजेच्या जनतेसाठी उपयुक्त आहेच, शिवाय मिरजेच्या सौंदर्यात भर टाकणारा हा पूल बनविण्यात आला आहे. त्यासाठी महारेलचे अधिकारी साई प्रताप व मुदस्सर भट यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
आज नागपूरमध्ये होणार उद्घाटन
या पुलाचे नागपूर येथे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे.
The post मिरजेच्या अभियंत्यांनी बांधला उड्डाण पूल appeared first on Bharat Live News Media.