प्रत्यक्ष कराने गाठले 58.34 टक्क्यांचे उद्दिष्ट
राजेंद्र जोशी
कोल्हापूर : देशात आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीला सुरुवात होण्यासाठी काही दिवसांचा अवधी आहे. दरम्यान, पहिल्या तीन तिमाही संपण्यापूर्वी देशाच्या तिजोरीत प्रत्यक्ष कराने घसघशीत वाढ नोंदविली आहे. प्रत्यक्ष कराच्या वसुलीमध्ये शेवटच्या तिमाहीला अधिक महत्त्व असते. परंतु, तत्पूर्वीच अर्थसंकल्पामध्ये निर्धारित केलेल्या उद्दिष्टाच्या 58.34 टक्क्यांचा कर जमा झाला आहे. यामुळे यंदाही प्रत्यक्ष कराचा महसूल अर्थसंकल्पीय उद्दिष्ट ओलांडून लीलया पुढे जाईल, असे चित्र निर्माण झाले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये यंदा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या महसुलाचे 33 लाख 61 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्यक्ष कराचा 18 लाख 23 हजार कोटी, तर अप्रत्यक्ष कराचा 15 लाख 38 हजार कोटी रुपयांच्या उद्दिष्टाचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या उपलब्ध माहितीनुसार एप्रिल ते नोव्हेंबर म्हणजेच तिसरी तिमाही संपण्यास एक महिना शिल्लक असतानाच प्रत्यक्ष कराचे 10 लाख 64 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. हा महसूल गतवर्षी याच कालावधीत जमा झालेल्या महसुलाच्या तुलनेत सुमारे 23.4 टक्क्यांनी अधिक आहे. हा महसूल करदात्यांचे परतावे (रिफंडस्) वजा जाता निव्वळ महसूल आहे.
12 लाख 67 हजार कोटींवर रक्कम
परताव्यासह ही रक्कम 12 लाख 67 हजार कोटी रुपयांवर गेली आहे. विशेष म्हणजे 15 डिसेंबर ही प्रत्यक्ष कराच्या तिसर्या अग्रीम हप्त्यासाठी (अॅडव्हान्स टॅक्स) महत्त्वाची तारीख समजली जाते. या दिवशी जमा होणार्या महसुलाचा विचार केला, तर तिसर्या तिमाहीअखेर महसूल उद्दिष्टाच्या 70 टक्क्यांवर जाईल, असे चित्र आहे.
The post प्रत्यक्ष कराने गाठले 58.34 टक्क्यांचे उद्दिष्ट appeared first on Bharat Live News Media.