India Women vs England Women : भारताची दमदार कामगिरी
मुंबई, वृत्तसंस्था : नऊ वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळणार्या भारतीय महिला संघाने (IND-W vs ENG-W) ऐतिहासिक कामगिरी केली. इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिलांनी पहिल्या दिवशी 7 बाद 410 धावा केल्या. महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 88 वर्षांत कुणालाच न जमलेला विक्रम आज भारतीय महिला संघाने करून दाखवला. यात शुभा सतीश (69), जेमिमाह रॉड्रिग्ज (68), यास्तिका भाटिया (66) आणि दीप्ती शर्मा (नाबाद 60) या चार खेळाडूंनी अर्धशतके झळकावली. इंग्लंडकडून बेलने सर्वाधिक दोन बळी घेतले.
महिलांच्या कसोटी सामन्यात एकाच दिवशी 400 हून अधिक धावा करणारा भारत इतिहासातील दुसरा संघ ठरला आहे. याआधी 88 वर्षांपूर्वी इंग्लंडने अशी कामगिरी केली होती. 1935 मध्ये क्राइस्टचर्च येथील लँकेस्टर पार्कवर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना महिला इंग्लिश संघाने 4 बाद 431 धावा केल्या होत्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्मृती मानधना 12 चेंडूंत 17 धावा करून लॉरेन बेलच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाली. शेफाली वर्माही स्वस्तात माघारी परतली. 47 धावांवर दोन विकेट गमावल्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि शुभा सतीश यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघींनी संयमी खेळी केली आणि उपाहारापर्यंत भारताची धावसंख्या दोन बाद 136 पर्यंत पोहोचवली. पहिल्या सत्रात एकूण 27 षटके खेळली गेली. दुसर्या सत्रात भारताला पहिला धक्का शुभा सतीशच्या रूपाने बसला, ती 69 धावा करून बाद झाली. जेमिमाह आणि शुभा यांच्यात तिसर्या विकेटसाठी 146 चेंडूंत 115 धावांची भागीदारी झाली. भारताला चौथा धक्का जेमिमाहच्या (99 चेंडूंत 68 धावा) रूपाने बसला. तिला लॉरेन बेलने क्लीन बोल्ड केले. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (49) आणि यास्तिका भाटिया यांनी पाचव्या विकेटसाठी 146 चेंडूंत 116 धावांची भागीदारी केली. हरमनचे अर्धशतक एका धावेने हुकले. तिने 81 चेंडूंत 49 धावा केल्या. यास्तिका भाटिया 88 चेंडूंत 66 धावा करून बाद झाली. स्नेह राणाने 73 चेंडूंत 30 धावा केल्या.
तीन खेळाडूंचे पदार्पण (IND-W vs ENG-W)
भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये आतापर्यंत एकूण 15 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने तीन सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने एक सामना जिंकला आहे. उर्वरित सर्व सामने अनिर्णीत राहिले. जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग आणि शुभा सतीश यांच्यासह तीन खेळाडूंनी भारतासाठी पदार्पण केले आहे.
पदार्पणाच्या सामन्यात शुभाची दमदार खेळी
अव्वल क्रमांकाची फलंदाज शुभाने तिच्या पहिल्याच कसोटी सामन्यात आपल्या शानदार फलंदाजीने प्रभावित केले. 90.79 च्या स्ट्राईक रेटने तिने 76 चेंडूंत 69 धावा केल्या. या खेळीत तिने 13 शानदार चौकारही मारले. ती पदार्पणाच्या कसोटी डावात 50+ धावा करणारी 12 वी भारतीय महिला फलंदाज ठरली आहे. याशिवाय शुभा सतीश महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला फलंदाज बनली.
यास्तिकाचे पहिले कसोटी अर्धशतक
विकेटकिपर फलंदाज यास्तिका भाटियाने आपल्या दुसर्या कसोटीत चमकदार फलंदाजी केली. तिने 75.00 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना तिने 88 चेंडूंत 66 धावा केल्या. या खेळीत तिने 10 चौकार आणि 1 षटकारही लगावला. हे तिचे महिला कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिले अर्धशतक आहे. आतापर्यंत तिने भारतासाठी 22 एकदिवसीय आणि 18 टी-20 सामने खेळले आहेत.
रॉड्रिग्जचा पदार्पणाचा सामना संस्मरणीय
शुभाशिवाय पदार्पण कसोटी सामना खेळणार्या रॉड्रिग्जनेही पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावून आपली छाप सोडली. 68.69 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना तिने 99 चेंडूंत 68 धावा केल्या. रॉड्रिग्जच्या आधी पदार्पणाच्या सामन्यात स्नेह राणा (80), चंद्रकांत कौल (75), शांता रंगास्वामी (74), संध्या अग्रवाल (71), शोभा पंडित (69), गार्गी बॅनर्जी (63), मिनोती देसाई (54), दीप्ती शर्मा (54), संगीता डबीर (52), स्मृती मानधना (51) आणि शुभा सतीश (69) यांनी अर्धशतके झळकावली आहेत.
दीप्तीचे तिसरे कसोटी अर्धशतक
भारताची अनुभवी अष्टपैलू खेळाडू दीप्तीनेही पहिल्या डावात अर्धशतक पूर्ण करत संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. 63.16 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना तिने 95 चेंडूंत नाबाद 60 धावा केल्या. या खेळीत तिने 9 चौकार आणि 1 षटकार लगावला. तिचे महिला कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील हे तिसरे अर्धशतक आहे. आतापर्यंत तिने भारतासाठी 3 सामन्यांत 212 धावा केल्या आहेत.
The post India Women vs England Women : भारताची दमदार कामगिरी appeared first on पुढारी.
मुंबई, वृत्तसंस्था : नऊ वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळणार्या भारतीय महिला संघाने (IND-W vs ENG-W) ऐतिहासिक कामगिरी केली. इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिलांनी पहिल्या दिवशी 7 बाद 410 धावा केल्या. महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 88 वर्षांत कुणालाच न जमलेला विक्रम आज भारतीय महिला संघाने करून दाखवला. यात शुभा सतीश (69), जेमिमाह रॉड्रिग्ज (68), यास्तिका भाटिया …
The post India Women vs England Women : भारताची दमदार कामगिरी appeared first on पुढारी.