सूर्याचा जाळ, कुलदीपचा धूर; दक्षिण आफ्रिकेचा चक्काचूर
जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था : तिसर्या टी-20 (IND vs SA) सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला तब्बल 106 धावांनी हरवले. याचबरोबर दोन्ही देशांमधील तीन टी-20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत राखण्यात टीम इंडियाला यश आले. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक ठरला होता. संघासाठी ‘करो या मरो’ स्थितीतल्या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दमदार शतकी (56 चेंडूंत 100) तर यशस्वी जैस्वालने (41 चेेंडूंत 60) अर्धशतकी खेळी केली. याच्या जोरावर भारताने 20 षटकांत 7 बाद 201 धावा केल्या. त्यानंतर कुलदीप यादवच्या 5 विकेटस्सह गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत दक्षिण आफ्रिकेला 95 धावांत गुंडाळून सामना 106 धावांनी जिंकला.
जोहान्सबर्ग येथे झालेल्या सामन्यात भारताच्या द्विशतकाचा पाठलाग करताना रिझा हेन्ड्रिक्स आणि मॅथ्यू ब्रित्झके यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात केली. भारताच्या मोहम्मद सिराजने पहिल्या षटकांत भन्नाट मारा केला. त्याच्या एकाही चेंडूला हेन्ड्रिक्सची बॅट लागली नाही. सिराजचे षटक निर्धाव गेले. या दबावातून बाहेर पडण्यासाठी ब्रित्झकेने मुकेशकुमारवर आक्रमण केले. दुसर्या चेंडूवर त्याला चौकार मिळाला; परंतु तिसर्या चेंडूने त्याच्या दांडीचा वेध घेतला.
पहिल्या चेेंडूपासून चाचपडणारा हेन्ड्रिक्स सिराजच्याच डायरेक्ट थ्रो चा बळी ठरला. हेन्रिच क्लासेनची विकेट अर्शदीपला मिळाली. धोकादायक कर्णधार एडेन मार्करमला रवींद्र जडेजाने आपल्या पहिल्या चेंडूवर बाद केले. मार्करमने 14 चेंडूंत 25 धावा केल्या. पहिल्या 6.1 षटकांत दक्षिण आफ्रिकेच्या 4 बाद 42 धावा झाल्या होत्या.
यानंतर डेव्हिड मिलरने आक्रमण सुरू केले. जडेजाला त्याने दोन षटकार मारले. याच षटकांत त्याने यष्टिरक्षकाकडे झेल दिला होता, पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते; परंतु तांत्रिक कारणास्तव डीआरएस उपलब्ध नसल्याने टीम इंडिया हतबल होती.
दहाव्या षटकांत कुलदीप यादव गोलंदाजीला आला, त्याने डेनोवॅन फेरिराला (12) बाद केले. जडेजाने आपली दुसरी विकेट घेताना अँडी फेहेलक्वायो (0) याचा परतीचा झेल घेतला. कुलदीपने केशव महाराजची दांडी उडवून आपल्या नावापुढेही दुसर्या विकेटची नोंद केली. 12 षटकानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 7 बाद 89 असा होता. (IND vs SA)
एका बाजूने विकेट जात असल्या तरी दुसर्या बाजूला डेव्हिड मिलर मैदानावर होता, पण कुलदीप यादवने एकाच षटकांत नांद्रे बर्गर (1), लिझाद विल्यम्स (0) आणि डेव्हिड मिलर (35) यांना बाद करून दक्षिण आफ्रिकेचा डाव 13.3 षटकांत 95 धावांत संपुष्टात आणला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. याचा साभार स्वीकार करीत यशस्वी जैस्वाल अन् शुभमन गिलने 2 षटकांत 29 धावा करून चांगली सुरुवात केली होती. मात्र, केशव महाराजने तिसर्या षटकात गिलला 12 तर तिलक वर्माला शून्यावर असे पाठोपाठ बाद केले. त्यानंतर आलेल्या सूर्याने यशस्वीला उत्तम साथ दिली. या दोघांनी तिसर्या विकेटसाठी 110 धावांची खणखणीत भागीदारी रचली.
41 चेंडूंत 60 धावा केल्यानंतर यशस्वी बाद झाला. त्याला तबरेज शम्सीने बाद केले. यशस्वी बाद झाला त्यावेळी भारताने 141 धावांचा टप्पा पार केला होता. यानंतर अर्धशतक पूर्ण केलेल्या सूर्याने डावाची आपल्या हातात घेतली. त्याने रिंकू सिंहसोबत 49 धावांची भागीदारी रचत संघाला 200 च्या जवळ पोहोचवले.
कर्णधार सूर्यकुमार देखील आपल्या शतकाजवळ पोहोचला होता. त्याने आपले शतक 55 चेंडूंत पूर्ण केले. सूर्याने 20 व्या षटकात हे शतक पूर्ण केले. सूर्याचे हे टी-20 मधील चौथे शतक आहे. मात्र, शतकानंतर पुढच्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर रवींद्र जडेजा (4) आणि जितेश शर्मा (4) पाठोपाठ बाद झाले. जितेशने मारलेला चेंडू सीमापार गेला होता; परंतु त्याने पायाने स्टम्प पाडल्यामुळे स्वयंचित झाला. अखेर भारताच्या 20 षटकांत 7 बाद 201 धावा झाल्या.
सूर्याचा शतकी ‘चौकार’ (IND vs SA)
सूर्यकुमारचे हे टी-20 क्रिकेटमधील चौथे शतक ठरले. तर दक्षिण आफ्रिकेत टी-20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सूर्यकुमार यादव पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. सूर्याने चार शतके चार वेगवेगळ्या देशांत झळकवली आहेत. त्याने मायदेशासह इंग्लंड, न्यूझीलंड आणि आता दक्षिण आफ्रिका येथे शतकी खेळी केल्या.
The post सूर्याचा जाळ, कुलदीपचा धूर; दक्षिण आफ्रिकेचा चक्काचूर appeared first on पुढारी.
जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था : तिसर्या टी-20 (IND vs SA) सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला तब्बल 106 धावांनी हरवले. याचबरोबर दोन्ही देशांमधील तीन टी-20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत राखण्यात टीम इंडियाला यश आले. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक ठरला होता. संघासाठी ‘करो या मरो’ स्थितीतल्या …
The post सूर्याचा जाळ, कुलदीपचा धूर; दक्षिण आफ्रिकेचा चक्काचूर appeared first on पुढारी.