इंडिया आघाडीत फाटाफुटीची चिन्हे
विश्लेषण : सुरेश पवार
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्रदीपक यशानंतर आता देशाचे राजकारण नव्या वळणावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. या तीन राज्यांतील निकाल केवळ भावी दिशादर्शकच नव्हे, तर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. या निकालाची तत्काळ परिणती म्हणून काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीत फाटाफूट उफाळून येण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
कर्नाटकातील काँग्रेस विजयानंतर इंडिया आघाडी जणू आता भाजपला पर्यायच ठरेल, अशी स्वप्ने विरोधी नेते पाहत होते; पण तीन राज्यांच्या निवडणूक निकालांनी हा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. या निकालात काँग्रेसच्या मर्यादा उघड्या पडल्या. हाती असलेली दोन राज्ये काँग्रेसने गमावली. मध्य प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात तर काँग्रेसची वाताहतच झाली. भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होईल, रस्सीखेच होईल, असे एक्झिट पोलचे अंदाज होते. ते फारसे खरे झाले नाहीत आणि तेलंगणात यश आले नसते, तर काँग्रेसची अवस्था कमालीची केविलवाणी झाली असती; पण देशव्यापी रणांगणाचा विचार करता, तेलंगणा हे सलाईन आहे, याने मूळ शरीरप्रकृती ठणठणीत होईल, असे नाही.
इंडिया आघाडीत सहभागी झालेल्या विरोधी पक्षांनी आता हे वास्तव जाणून घेतले असून, त्यातून काही पक्षनेत्यांच्या आघाडीशी काडीमोड घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातील ठळक नाव म्हणजे जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांचे. इंडिया आघाडीची बैठक बोलावण्यात आली होती; पण या बैठकीला आपण जाणार नसल्याचे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले होते. इंडिया आघाडीचे नेतृत्व आपल्याकडे द्यावे, ही नितीश कुमार यांची सुप्त इच्छा होती. ती काही पूर्ण झालेली नाही. शिवाय, पंतप्रधानपदासाठी आपले नाव पुढे यावे, हीसुद्धा त्यांची महत्त्वाकांक्षा; पण त्यालाही प्रतिसाद नसल्याने ते नाराजच आहेत. आता काँग्रेसच्या पिछेहाटीमुळे त्यांना निमित्त मिळाले आहे.
नितीश कुमार यांच्याप्रमाणे समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव हेही काँग्रेसवर असंतुष्ट आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसशी जागावाटप करण्याचा प्रस्ताव अखिलेश यांनी मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते कमलनाथ यांना दिला होता; पण त्यांनी तो फेटाळला. अखिलेश यांना त्यांचा राग आहे. शिवाय, उत्तर प्रदेश या आपल्या गृह राज्यात काँग्रेसचा वरचष्मा ते सहन करणार नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीपासून ते लवकरच दूर होतील, अशीच चिन्हे आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या ममतादीदी इंडिया आघाडीत मनाने कधी सहभागी झालेल्याच नाहीत आणि पश्चिम बंगालमध्ये त्या काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची सूतराम शक्यता नाही. त्यांनीही आता इंडिया आघाडीची बैठक टाळली आहे. आम आदमी पक्षाने आताच उत्तर भारतात आपणच सरस असल्याचा ढोल वाजवायला सुरुवात केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीत किती पक्ष राहणार, हा प्रश्नच आहे.
तिसर्या आघाडीची शक्यता
इंडिया आघाडीतून काही पक्ष फुटून बाहेर पडले, तर त्यातून पुन्हा एकदा तिसरी आघाडी उभी राहू शकते. तसे झाले तर आगामी लोकसभा निवडणुकीत तिरंंगी, चौरंगी, बहुरंगी लढती होतील. अशा लढती भाजपच्याच पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. त्यातून लोकसभा निवडणुकीत भाजपला चारशे जागांचा पल्ला गाठण्याची उमेद बाळगता येऊ शकते.
The post इंडिया आघाडीत फाटाफुटीची चिन्हे appeared first on पुढारी.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्रदीपक यशानंतर आता देशाचे राजकारण नव्या वळणावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. या तीन राज्यांतील निकाल केवळ भावी दिशादर्शकच नव्हे, तर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. या निकालाची तत्काळ परिणती म्हणून काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीत फाटाफूट उफाळून येण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. कर्नाटकातील काँग्रेस विजयानंतर इंडिया …
The post इंडिया आघाडीत फाटाफुटीची चिन्हे appeared first on पुढारी.