आ. आशुतोष काळेंवर मंत्री विखेंची स्तुती सुमने
कोळपेवाडीः पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव मतदार संघाचा मागील चार वर्षांमध्ये झालेला विकास पाहता आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासाची केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांच्या रूपाने कोपरगाव मतदार संघाला उमदं, कर्तृत्वान, गतिमान नेतृत्व लाभले. याचा कोपरगाव मतदार संघाच्या जनतेसह मलादेखील आनंद वाटतो, अशा स्तुती सुमनांची उधळण महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी आ. काळे यांच्यावर केली. कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे आ. काळे यांच्या प्रयत्नांतून 4 कोटी रुपये निधीतून बांधलेल्या नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसह शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन महसूलमंत्री विखे पा. यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. अध्यक्षस्थानी आ. काळे होते.
मंत्री विखे म्हणाले, आ. काळे यांच्या पुढाकारातून माहेगाव देशमुख प्राथ. आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण झाली. सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यात 8 शासकीय वाळू डेपो सुरु होत आहेत. अद्याप वाळू धोरणात पुर्णतः पारदर्शकता आली नसल्याची खंत व्यक्त करीत ते म्हणाले, भविष्यकाळात नवीन धोरणामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्तीत- जास्त नागरिकांना या धोरणांचा लाभ मिळावा. घरकुल व सरकारी कामांसाठी मोफत वाळू उपलब्ध व्हावी, हा यामागे उद्देश असल्याचे मंत्री विखे यांनी स्पष्ट केले.
गोदावरीच्या आवर्तनाबाबत आ. काळेंचा आग्रह आहे. यासाठी काही दिवसांपासून ते माझ्या संपर्कात आहेत. यावर तातडीने नासिक पाटबंधारेच्या अधिकार्यांची बैठक घेणार आहे. आ. काळे यांनी विकासात्मक कामांसाठी पुढाकार सुरु ठेवल्यास कोपरगाव मतदार संघाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी राज्य सरकारचे सहकार्य त्यांच्या मागे खंबीरपणे उभे करून, त्यांना अपेक्षित विकास करणार असल्याचा शब्द मंत्री विखे यांनी दिला.
यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले, कोरोनाने आरोग्य व्यवस्था किती तोकड्या होत्या, हे सिद्ध केल्याने या मतदार संघाची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिला. कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व्हावे यासाठी पाठपुरावा करून 100 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळवून 28.84 कोटी निधी मंजूर करून आणला. माहेगाव देशमुख प्राथ. आरोग्य केंद्र इमारतीस 4 कोटी, संवत्सर 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी वसाहतीस 22.78 कोटी तर तिळवणी प्राथ. आरोग्य केंद्रास मंजुरी मिळावी, यासाठी प्रस्ताव दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार संघात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे आवर्तनाची गरज भासते. यासाठी पालकमंत्री विखे यांच्याकडे मागणी केल्यामुळे लवकरच आवर्तन देण्याचा त्यांनी शब्द दिला. निवडून आल्यापासून कोपरगाव मतदार संघात एमआयडीसी व्हावी, यासाठी पाठपुरावा करीत होतो. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे व विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. पालकमंत्री विखे पा. यांचा रेटा मिळाल्याने कोपरगाव मतदार संघात सोनेवाडी- चांदेकसारे भागात शेती महामंडळाच्या जागेत एमआयडीसी उभारण्याचा निर्णय महायुती शासनाने घेतला.
यावेळी जिरायती भागाला निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी मिळवून देवून, अतिरिक्त दीड टीएमसी पाणी मिळवून दिल्याबद्दल, मतदार संघात एमआयडीसी उभारण्यास मंजुरी मिळविल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांचा नागरिकांनी जाहीर सत्कार केला.
यावेळी ‘महानंद’चे चेअरमन राजेश परजणे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जि. प. मुख्य कार्य. अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी व बाळासाहेब कोळेकर, जि. आ. अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, प्रांताधिकारी किरण सावंत व माणिकराव आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, तहसीलदार संदिपकुमार भोसले, ग.वि. अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. विकास घोलप, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, छबुराव आव्हाड, कारभारी आगवण, राजेंद्र जाधव,चंद्रशेखर कुलकर्णी, माधवराव खिलारी, काकासाहेब जावळे, बाबासाहेब कोते, संभाजीराव काळे आदी उपस्थित होते.
मंत्री विखेंचे हेलिकॉप्टर पोहोचू न शकले नाही..!
माहेगाव देशमुख येथील प्राथ. आरोग्य केंद्र उद्घाटन व शासकीय वाळू डेपोचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते होणार होते, परंतु खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर कार्यक्रमस्थळीपोहोचू न शकल्यामुळे त्यांना अर्ध्या वाटेवरून परतावे लागले. यामुळे मंत्री विखे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमांचे उद्घाटन केले. दरम्यान, प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
अजितदादांप्रमाणेच मंत्री विखेंचाही आशीर्वाद!
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द देत आशिर्वाद दिला. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. देखील माझ्यामागे खंबीरपणे उभे आहेत. त्यांचाही आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. यामुळे कुठलीही अडचण येणार नाही, असे भावनिक उद्गारआ. आशुतोष काळेंनी काढले.
The post आ. आशुतोष काळेंवर मंत्री विखेंची स्तुती सुमने appeared first on पुढारी.
कोळपेवाडीः पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव मतदार संघाचा मागील चार वर्षांमध्ये झालेला विकास पाहता आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासाची केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांच्या रूपाने कोपरगाव मतदार संघाला उमदं, कर्तृत्वान, गतिमान नेतृत्व लाभले. याचा कोपरगाव मतदार संघाच्या जनतेसह मलादेखील आनंद वाटतो, अशा स्तुती सुमनांची उधळण महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी आ. काळे …
The post आ. आशुतोष काळेंवर मंत्री विखेंची स्तुती सुमने appeared first on पुढारी.