Pcmc News : लष्करामुळे शहराला मिळतोय ऑक्सिजन !
मिलिंद कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील शेती व माळरान जागेत अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. तसेच, बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागेतही इमारती व व्यापारी संकुल निर्माण होत आहेत. परिणामी, शहरातील रिकामी जागा झपाट्याने कमी होत आहे; मात्र भारतीय संरक्षण विभागाच्या मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा असल्याने शहरात हरित क्षेत्र अद्याप टिकून आहे. लष्कराचे दाट हिरवळीचे क्षेत्र संपूर्ण शहराला मोफत ताजी व स्वच्छ हवा म्हणजेच ऑक्सिजन पुरविण्याचे काम करीत आहे. आजूबाजूच्या ग्रामपंचायती मिळून 4 मार्च 1970 ला पिंपरी-चिंचवड नगरपालिका अस्तित्वात आली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका सन 11 ऑक्टोबर 1982 ला अस्तित्वात आली. पिंपरी-चिंचवड शहराचे क्षेत्र 181 चौरस किलोमीटर आहे. भारतीय संरक्षण विभागाच्या विविध आस्थापनांसाठी पिंपरी-चिंचवडमधील शेतजमीन व मोकळी जागा ताब्यात घेतली गेली. त्यामुळे शहराच्या चारही बाजूस संरक्षण विभागाच्या आस्थापना आहेत.
अतिक्रमण, वर्दळविरहित भाग
या संरक्षण विभागाच्या शहरात सुमारे 25 टक्के जागा आहे. त्या भागात कोणतेही अतिक्रमण नाही. काँक्रिटीकरणाचे प्रमाण कमी आहे. नागरी वाहतूक, रहदारीस बंदी असल्याने येथे वाहनांची वर्दळ कमी आहे. त्यामुळे वायू, ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण अल्प आहे. प्रतिबंधित क्षेत्र असल्याने मानवी हस्तक्षेप नगण्य आहे. शहराच्या तुलनेत या भागात निवासी क्षेत्र सर्वात कमी आहे. तेथील 75 टक्के पेक्षा अधिक मोकळी जागा असल्याने तेथे झाडे लावून संवर्धन करण्यात आले आहे.
हरित पट्ट्यात नैसर्गिक स्त्रोत, प्राण्यांचा अधिवास
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्या भागात दरवर्षी प्राधान्याने झाडे लावली जात आहेत. परिणामी, या भागात देशी झाडांची संख्या वाढून घनदाट वन तयार झाले आहे. नैसर्गिक अधिवास जास्त आहे. पाणी तसेच इतरही नैसर्गिक स्त्रोत अधिक आहेत. त्यामुळे या भागात मोर, कासव, विविध जातीचे पक्षी, ससे, साप आणि विविध प्राण्यांचा अधिवास आहे.
शहरीकरणातही लष्कराचे क्षेत्र हिरवेगार
पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती निर्माण होत आहे. लोकवस्ती वाढून ती दाट होत आहे. सिमेंट जंगल वाढून शहरीकरण फोफावत आहे. मात्र, गुगल मॅपवर पाहिल्यास संरक्षण विभागाच्या जागेचा परिसर आजही गडद हिरवा दिसून येतो. हा हरित क्षेत्रांमुळे पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ व ताजी हवा मिळत आहे. शहरवासीयांना मोफत ऑक्सिजन मिळत आहे. शहराची हवा स्वच्छ ठेवण्यात संरक्षण विभागाचा वाटा मोठा आहे.
डेअरी फार्मला टाळे, पडीक जागा खासगी भागीदारीत विकसित करणार
केंद्राच्या संरक्षण विभागाने आपल्या आस्थापनांचे खासगीकरणास सुरुवात केली आहे. खर्च परवडत नसल्याने पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म बंद करण्यात आले आहे. त्या जागेत गृहप्रकल्प किंवा आस्थापनासाठी बांधकाम होण्याची शक्यता आहे. तसेच, दिघी, भोसरी, बोपखेल व कळस येथील लष्कराच्या पडीक आणि वापरात नसलेल्या एकूण 524 एकर जागेत गृहप्रकल्प, शैक्षणिक संस्था, शॉपींग मॉल, रुग्णालय, कंपन्या व इतर प्रकल्प बांधकामांसाठी जागा खासगी संख्या व कंपन्यांना भाड्याने देण्यात येत आहेत. त्याची प्रकिया सुरू झाली आहे. त्यामुळे या भागांत सिमेंट काँक्रीटीकरण होणार आहे. त्यामुळे भविष्यात शहरातील संरक्षण विभागाची हरित क्षेत्रे घटण्याची शक्यता आहे.
या आहेत संरक्षण विभागांच्या आस्थापना
पिंपरी येथील पुणे-मुंबई जुना महामार्ग ते पवना नदीपर्यंत मिलिटरी डेअरी फार्मचा विस्तार आहे. पिंपळे निलख येथे मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंट (औंध कॅम्प) आहे. त्याचा विस्तार प्रचंड आहे. या कॅम्पची सीमाभिंत पिंपळे निलख, सांगवी, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरवला खेटून आहे. सांगवीत सीक्यूएई ही संरक्षण विभागाची संशोधन संस्थाही आहे. दापोडी येथे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (सीएमई) आहे. हे लष्करी महाविद्यालय दापोडी, बापोडी, खडकी, बोपखेल, दिघी, नाशिक फाटा, पुणे-नाशिक महामार्ग, भोसरी व कासारवाडी इतक्या मोठ्या भागात वसले आहे. येथे कयाकिंंगचा सराव करण्यासाठी कृत्रिम तलावाही निर्माण करण्यात आला आहे. तर, दिघी येथे लष्कराचे टी बी टू हे युनिट आहे. निगडी, रूपीनगर, तळवडे या भागाला लागून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड व संरक्षण विभागाची जागा आहे. बोपखेलला लागून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व अॅम्युनिशन फॅक्टरी, 512 आर्मी बेस वर्कशॉप आदींच्या जागा आहेत. तसेच, पिंपरी येथे केंद्र सरकारची हिंदुस्थान अॅन्टिबॉयोटिक्स लिमिटेड कंपनीचीही (एचए) शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा आहे. या आस्थापनांची मोकळी जागा अधिक आहे. त्या ठिकाणी झाडांचे संवर्धन करण्यात आले आहे.
‘संरक्षण’च्या हद्दीत 5 लाख झाडे
पिंपरी-चिंचवड शहरात जागा उपलब्ध होत नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाकडून संरक्षण विभागाच्या विविध जागेत दरवर्षी 50 हजार ते 1 लाख झाडे लावण्यात येतात. निगडी, औंध कॅम्प, दिघी, दापोडीतील सीएमई या भागांत महापालिकेने झाडे लावली आहेत. आतापर्यंत तब्बल 5 लाख झाडे या भागांत लावण्यात आली आहेत. त्यासाठी लष्करी अधिकार्यांचे सहकार्य मिळते. त्यातील 95 टक्क्यांपेक्षा अधिक झाडे जगली आहेत. त्या भागांत हरितपट्टा निर्माण होत आहे. तसेच, महापालिकेच्या वतीने शहरात दरवर्षी एकूण 1 ते 2 लाख झाडे लावण्यात येतात. वृक्ष गणनेनुसार शहरात 33 लाखांपेक्षा अधिक झाडे आहेत. महापालिकेचे 185 उद्याने आहेत. तेथे ही देशी झाडे लावण्यात येतात. या वनीकरणामुळे शहरात स्वच्छ व ताज्या हवेचे प्रमाण वाढत आहे, असे महापालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके यांनी सांगितले.
डेअरी फार्ममुळे ताजी हवा, लख्ख प्रकाश
पिंपरी गावाच्या शेजारी मिलिटरी डेअरी फार्मची मोकळी जागा आहे. तेथे मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. त्यामुळे आम्हांला ताजी व स्वच्छ हवा मिळते. घरात पंखे लावण्याची गरज भासत नाही. तसेच, मोर इतर पक्षांचे सुमधुर आवाज दररोज ऐकू येतात. ताजी हवा व लख्ख सूर्यप्रकाश मिळत असल्याने उत्साह वाढतो. नवी ऊर्जा मिळते, असे डेअरी फार्म शेजारील म्हाडाच्या इमारतीत राहणारे फिरोज खान यांनी सांगितले.
The post Pcmc News : लष्करामुळे शहराला मिळतोय ऑक्सिजन ! appeared first on पुढारी.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील शेती व माळरान जागेत अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. तसेच, बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागेतही इमारती व व्यापारी संकुल निर्माण होत आहेत. परिणामी, शहरातील रिकामी जागा झपाट्याने कमी होत आहे; मात्र भारतीय संरक्षण विभागाच्या मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा असल्याने शहरात हरित क्षेत्र अद्याप टिकून आहे. लष्कराचे दाट हिरवळीचे क्षेत्र संपूर्ण शहराला …
The post Pcmc News : लष्करामुळे शहराला मिळतोय ऑक्सिजन ! appeared first on पुढारी.