जनावरांच्या पोटात जात आहेत प्लास्टिक पिशव्या
अजय कांबळे
कुरकुंभ : कचराकुंड्यात आढळून येणारं खराब अन्न, प्लास्टिक पिशव्या आणि कचऱ्यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. कचराकुंडीतील अन्न खाताना जनावरांच्या पोटात प्लास्टिक पिशव्या जात असून, तोंडात (जबड्यात) पत्र्याचे डब्बे अडकून राहत असल्याचे चित्र ग्रामीण भागात सर्रास दिसून येते. सध्या दौंड तालुक्यातील ग्रामीण भागाचा विस्तार झपाट्याने वाढत असून, जागोजागी इमारती, घरे, बंगले, सोसायटी, नागरी वसाहती, टपऱ्या, दुकाने, हॉटेल वाढलेले आहे. या माध्यमातून कचरादेखील वाढलेला असून, हॉटेलचे खराब अन्न, भाजीपाला, कचरा, विनावापराच्या विविध वस्तू कचराकुंड्यासह कुठेही फेकून दिल्या जातात.
काही मूळ मालकांनी त्यांची जनावरे मोकाट सोडलेली आहेत तसेच जनावरांच्या जीवावर काहीजण धंदा करीत असून, त्यांची अनेक जनावरे विविध रस्त्यांवर मोकाट फिरत असतात. त्यांचे जनावरांच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष नसते. भूक लागल्यावर बहुतांश जनावरे थेट कचराकुंड्यावर दाखल होतात. येथील अन्न खाताना प्लास्टिक पिशव्या, दूध पावडरचे रिकामे पत्र्याचे डब्बे, तारा, वायर, काचा, खिळे, लोखंडी व प्लास्टिक तुकडे अशा विविध वस्तूंपासून जनावरांना धोका असतो. बऱ्याच जनावरांच्या पोटात प्लास्टिक व तोंडात पत्र्याचे डब्बे अडकून बसतात. याकडे कोणाचे लक्ष गेले तरच डब्बा अडकल्याचे लक्षात येते. अन्यथा जनावराला त्रास सहन करावा लागतो. गाय, बैलांच्या तोंडातून डब्बे काढणे मुश्कील काम असते. संबंधित जनावरांना बेशुद्ध करावे लागते. बऱ्याचदा या कामासाठी रेस्क्यू पथकाला बोलवावे लागते तसेच काही सामाजिक कार्यकर्ते व जनावरांचे डॉक्टर या कामासाठी नेहमी प्रयत्न करतात. याबाबत यश न आल्यास जनावरांचे जीव गेले आहेत.
कत्तलीचा धंदादेखील जोमात
लहान वयाचे गाय, बैल, म्हशी अशा विविध जनावरांना त्यांचे मालक दिवसभर मोकाट सोडून देतात. दिवसभर चरून रात्री घरी येण्याची सवय त्यांना लावली जाते. अशा पध्दतीने जनावरांना मोठे केले जाते. यानंतर या जनावरांच्या जीवावर पैसे कमविण्याचा धंदा केला जातो. चांगले पैसे येतील इतके मोठ्या झालेल्या जनावरांची कत्तल केली जाते. वर्षानुवर्षे हा धंदा जोमाने केला जात आहे.
The post जनावरांच्या पोटात जात आहेत प्लास्टिक पिशव्या appeared first on पुढारी.
कुरकुंभ : कचराकुंड्यात आढळून येणारं खराब अन्न, प्लास्टिक पिशव्या आणि कचऱ्यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. कचराकुंडीतील अन्न खाताना जनावरांच्या पोटात प्लास्टिक पिशव्या जात असून, तोंडात (जबड्यात) पत्र्याचे डब्बे अडकून राहत असल्याचे चित्र ग्रामीण भागात सर्रास दिसून येते. सध्या दौंड तालुक्यातील ग्रामीण भागाचा विस्तार झपाट्याने वाढत असून, जागोजागी इमारती, घरे, बंगले, सोसायटी, नागरी वसाहती, …
The post जनावरांच्या पोटात जात आहेत प्लास्टिक पिशव्या appeared first on पुढारी.