क्रिप्टो करन्सीचे मायाजाल
डॉ. योगेश प्र. जाधव
क्रिप्टो करन्सीच्या दुष्टचक्रात आजवर जगभरातील अनेकजण अडकले आहेत. अगदी युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष क्रिस्टिन लिगार्ड यांचा मुलगाही त्याला अपवाद ठरला नाही. क्रिप्टोमधील चढउतारांचा अंदाज त्याला येऊ शकला नाही आणि जवळपास 60 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक गमावण्याची वेळ त्याच्यावर आली. लिगार्ड यांचा मुलगा असो किंवा सामान्य नागरिक असो; आर्थिक नुकसान होणे हे प्रत्येकासाठी क्लेशदायक असते.
प्राचीन काळात राजे-महाराजे विरंगुळ्यासाठी द्यूत खेळायचे. महाभारतात द्यूतामध्ये कौरवांकडून पराभूत झाल्यानंतर पांडवांना 12 वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासात काढावे लागले होते. काळाच्या ओघात द्यूताची जागा वेगवेगळ्या प्रकारच्या जुगाराने घेतली. बहुतेकदा सहज मिळणारा पैसा, झटपट श्रीमंत होण्याची लालसा त्यामागे असते. याच मानवी स्वभावाचा किंवा मनोवृत्तीचा फायदा चाणाक्ष व्यावसायिकांसाठी मोठे भांडवल ठरत असल्याचे आजच्या बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेत दिसून येते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर मानवी मोहाला खतपाणी घालून भरभक्कम कमाई करणार्यांची एक अर्थव्यवस्थाच उदयास आली आहे. सोशल मीडिया हे लुबाडणुकीसाठीचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. त्यातूनच कधी लाखाची लॉटरी लागल्याचा मेसेज पाठवून बँक खाते रिकामे केल्याची घटना समोर येते; तर कुणी गुंतवणुकीवर महिन्याला 10 ते 12 टक्के परतावा देतो, असे सांगून फसवणूक करताना दिसतो. कोविडोत्तर काळात टेलिग्राम, यू ट्यूब, व्हॉटस्अॅप यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर बाजार, क्रिप्टो करन्सी आदींमध्ये पैसे गुंतवून लाखो रुपयांची कमाई सहजशक्य असल्याचा दावा करणार्यांचे उदंड पीक आल्याचे दिसत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अशा घटनांमध्ये बळी पडलेल्यांनी कोट्यवधी रुपये गमावल्याचे समोर आले आहे. क्रिप्टो करन्सी या आभासी चलनाला तर भारतात मान्यताच नाहीये. रिझर्व्ह बँकेने आणि केंद्र सरकारनेही ही बाब स्पष्ट केली आहे. असे असूनही बिटकॉईनमध्ये अगदी गावा-खेड्यातील अनेकांनी गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले
आहे.
वास्तविक, क्रिप्टो करन्सीचे मोहजाल केवळ भारतातच आहे असे नाही. याच्या दुष्टचक्रात जगभरातील अनेकजण अडकलेले आहेत. प्रस्तुत लेखाचे औचित्य म्हणजे युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा क्रिस्टिन लिगार्ड यांनी आपल्या मुलाला क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीतून कशा प्रकारे नुकसान झाल्याची कहाणी नुकतीच जाहीर केली आहे. ती करत असताना त्यांनी या आभासी चलनांना ‘बेकार’ अशी उपमाही दिली आहे. तसेच हा पूर्णतः सट्टेबाजीचा प्रकार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. अनेक जागतिक नियामकांनी क्रिप्टोकरन्सीबाबत शंका व्यक्त केली आहे. अलीकडेच सेंट्रल बँक ऑफ ब्रिटनने बिटकॉईनचा पेमेंटचे साधन म्हणून वापर करणे योग्य नसल्याचे सांगितले होते. ब्रिटनमधील नियामकांनीही अनेक वेळा लोकांना क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. युरोपियन युनियनच्या अधिकार्यांनी यापूर्वी लोकांना क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. खुद्द क्रिस्टीन लिगार्ड यांनी याआधीही क्रिप्टोबाबत नकारात्मक भूमिका मांडताना त्यांचे कठोरपणे नियमन करण्याची गरज व्यक्त केली होती. गतवर्षी त्यांनी बिटकॉईनचा मोठ्या प्रमाणावर मनी लाँडरिंगसाठी वापर केला जात असल्याचे म्हटले होते. तथापि क्रिप्टो करन्सीजच्या सद्य:स्थितीवर त्या लक्ष ठेवून आहेत. कारण त्यांच्या मुलाने आईच्या सल्ल्याविरुद्ध त्यात गुंतवणूक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुंतवणुकीतील जोखमीबाबत वारंवार इशारा देऊनही त्यांच्या मुलाने यात पैसा गुंतवला आणि आज त्याने जवळपास सर्व पैशांचे नुकसान केले आहे.
लिगार्ड यांच्या निवेदनानंतर क्रिप्टोजगतात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मुलाने केलेल्या गुंतवणुकीचा आणि नुकसानीचा तपशील जाहीर केलेला नसला तरी खूप मोठा फटका त्याला बसला असण्याची शक्यता लिगार्ड यांच्या संतापातून व्यक्त होते. क्रिस्टीन लिगार्ड या निष्णात अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष राहिल्या आहेत. यापदी दोन वेळा त्यांची निवड झाली. जगभरात त्यांचा चाहता वर्ग आहे. जगभरातील शक्तिशाली महिलांच्या यादीत पहिल्या दहामध्ये त्यांचे नाव आहे. क्रिप्टो करन्सीला युरोपियन देशांमध्ये नियमांची चौकट आखण्यासाठी, नियमन करण्यासाठी जी धोरणे घेतली जातील, त्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. अशा व्यक्तीच्या मुलालाही क्रिप्टोमधील चढउतारांचा अंदाज येऊ शकला नाही आणि त्याच्यावर जवळपास 60 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक गमावण्याची वेळ आली. मग ज्या सर्वसामान्यांना अद्याप क्रिप्टो करन्सी म्हणजे नेमके काय आहे हेच ठाऊक नाहीये त्यांचे किती दिवाळे निघाले असेल याची कल्पनाच केलेली बरी !
कोविड काळात तर क्रिप्टोबाजार अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला होता. क्रिप्टो करन्सीमधील बिटकॉईन या सर्वांत लोकप्रिय चलनाचे मूल्य नोव्हेंबर 2021 मध्ये 68 हजारांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले असताना जून 2002 च्या उतरार्धात ते 20 हजारांच्या खाली पोहोचले. नोव्हेंबर 2021 मध्ये क्रिप्टो करन्सीचे एकत्रित बाजार भांडवल 3 लाख कोटीपेक्षा जास्त झाले होते.
जगातील बहुतेक देशांच्या जीडीपीपेक्षाही ते अधिक आहे. परंतु आठ महिन्यांत दोन लाख कोटींपेक्षा अधिक प्रमाणात घट झाली होती. बिटकॉईन आणि तिची जवळची प्रतिस्पर्धी असलेली इथरियम या दोन्ही करन्सींचे बाजार भांडवल अनुक्रमे 400 अब्ज आणि 140 अब्ज डॉलर्स एवढे घसरले होते. काही संस्थांनी शेअर बाजार आणि बाँडस्मधील घसरणीची भरपाई करण्यासाठी बिटकॉईन विकत घेतले होते. त्यांना दुहेरी नुकसान सहन करावे लागले होते. क्रिप्टो करन्सी हे स्थापनेपासूनच एक तात्पुरते, अस्थिर आणि धोकादायक आर्थिक साधन आहे. जगभरातील प्रमुख देशांची सरकारे योग्य नियम तयार करण्यासाठी क्रिप्टो करन्सीच्या अस्थिरतेचा आणि मुख्य घटकांचा बारकाईने अभ्यास करत आहेत.
क्रिप्टो करन्सी हा दोन शब्दांचा मिळून बनलेला शब्द असून, तो मूळ लॅटिन भाषेतील आहे. त्या शब्दाचा अर्थ ‘लपलेला पैसा’ किंवा ‘डिजिटल पैसा’ असा होतो. क्रिप्टो करन्सी हाही एक प्रकारचा डिजिटल पैसा आहे. हा पैसा आपण सोबत बाळगू शकतो; पण त्याला आपण स्पर्श करू शकत नाही. नाण्याच्या किंवा नोटेच्या स्वरूपात हा पैसा खिशात ठेवता येत नाही. तो पूर्णपणे ऑनलाईन असतो. क्रिप्टो करन्सीची सुरुवात नेमकी कोणी केली, याबाबत अचूक माहिती उपलब्ध नाही. परंतु बहुतांश लोक असे मानतात की, 2009 मध्ये सतोशी नाकामोतो यांनी क्रिप्टो करन्सी सुरू केली. तत्पूर्वीही डिजिटल पैसा तयार करण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी आणि देशांनी काम केले होते. अमेरिकेने 1996 मध्ये इलेक्ट्रॉनिक सोने तयार केले होते. हे सोने आपण जवळ बाळगू शकत नाही; परंतु ते देऊन अन्य वस्तू विकत घेऊ शकतो. अर्थात 2008 मध्ये त्यावर बंदी घालण्यात आली. डिजिटल चलनावर कोणत्याही एका देशाचे किंवा सरकारचे नियंत्रण असत नाही. सुरुवातीला हे चलन अवैध मानण्यात आले होते; परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहून अनेक देशांनी हा पैसा कायदेशीर केला आहे. काही देश आपले स्वतःचे आभासी चलन व्यवहारात आणण्याच्या प्रयत्नांत आहेत.
बिटकॉईन हे सध्या जगातील सर्वांत महागडे व्हर्च्युअल म्हणजे आभासी चलन आहे. बिटकॉईन या चलनासाठी ना कोणती बँक आहे, ना एटीएम! आतापर्यंतच्या फसवणुकीच्या घटना पाहून अजून हे चलन कायदेशीर करण्यात आलेले नाही; परंतु तरीही भारतीय लोक या चलनाच्या मायाजालात अडकले आहेत. पैशांच्या अवैध देवाणघेवाणीत बँकांचे नियम जिथे आड येतात, तिथे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या चलनाचा वापर करतात. क्रिप्टो करन्सीमधून केली जाणारी देवाणघेवाण ही एका कोडच्या आणि पासवर्डच्या मदतीने केली जाते. अवैध प्रकारे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पैसा पाठविण्यासाठी या चलनाचा वापर केला जात आहे, हे वास्तव स्वीकारायला हवे. भारतात
कोरोनाकाळातच अशा प्रकारच्या चलनावर बंदी घालण्याची चर्चा जोरात सुरू झाली होती; परंतु भारतीय मोठ्या संख्येने क्रिप्टो करन्सी खरेदी करीत आहेत. नफा कमावण्याचा कोणताही मार्ग आणि संधी लोक सोडू इच्छित नसल्याने क्रिप्टो करन्सीचे मूल्य वाढत जात आहे. बिटकॉईन, इथेरियम, डॉजकॉईन यासह जवळजवळ सर्वच क्रिप्टो करन्सीची खरेदी-विक्री ऑनलाईन केली जाते. सरकारे नोटा छापतात आणि चलनांचे मूल्य कमी-जास्त होत राहते. मात्र हे चलन कोणत्याही सरकारच्या अधिपत्याखाली असत नाही. याची खरेदी-विक्री करण्याची कोणतीही अधिकृत व्यवस्थाही करण्यात आलेली नाही. एखाद्या नाण्याप्रमाणे किंवा नोटेप्रमाणे हे चलन आपल्या खिशात राहू शकत नाही, तर ते पूर्णपणे ऑनलाईन असते आणि कोणत्याही नियमाविना या माध्यमातून व्यापार केला जातो. आज किती भारतीयांच्या जवळ क्रिप्टो करन्सी आहे, किंवा किती लोक या करन्सीच्या माध्यमातून व्यापार करतात, याबाबत कोणतीही माहिती वा आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध नाही, असे सरकार सांगते. परंतु भारतीयांनी डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे तसेच महामारीच्या काळात त्यात वाढ झाली आहे, ही बाब निश्चित मानली जाते.
बिटकॉईनचा प्रारंभ झाला तेव्हा लोकांना त्याची फारशी माहिती नव्हती आणि तिचे मूल्यही कमी होते. परंतु महामारीच्या काळात लॉकडाऊन लागला. सरकारांनी अनेक प्रकारे प्रोत्साहन दिले आणि युरोप, अमेरिका, कोरिया, जपान आणि चीनमध्ये अनेक ऑनलाईन गुंतवणूकदार बाजारात उतरले. कारण त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळत असल्यामुळे लोक त्या पैशांमधून हे चलन खरेदी करू लागले. भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकदार सुरक्षितता निधी असतो. जर गुंतवणूकदाराचे पैसे बुडाले तर एक्स्चेंजकडून त्याची भरपाई दिली जाते. या प्रक्रियेचे नियमन सेबी करते. परंतु क्रिप्टो करन्सी किंवा आभासी चलनाच्या रूपात गुंतविलेल्या रकमेचे नियमन करणारी यंत्रणा नाही. अशा स्वरूपात गुंतविलेला पैसा बुडाला तर संबंधिताला ती कोणाचीच जबाबदारी मानली जात नाही. परिणामी या चलनाचे मूल्य घसरल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते तेव्हा हात चोळत बसण्यावाचून पर्याय नसतो. मागील काळात चीनने आपल्या वित्तसंस्था आणि पेमेंट कंपन्यांना क्रिप्टो करन्सीशी संबंधित देवाणघेवाण किंवा अन्य कोणत्याही प्रकारची सेवा देण्यासाठी प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला. ही बातमी बाजारात समजताच हाहाकार उडाला आणि पाहता पाहता काही तासांतच या चलनाचे मूल्य प्रचंड प्रमाणात कोसळले होते.
आभासी चलन कोणत्याही देशाच्या सरकारच्या अधिपत्याखाली येत नाही, असा इशारा विविध देशांच्या सरकारांनी आपापल्या नागरिकांना दिलेला आहे. परंतु तरीही अधिक कमाईच्या आमिषाने लोक त्याच्यामागे धावत राहतात. या कमाईप्रेमाचा गैरफायदा घेत आज अनेक ठग बाजारात उतरलेले आहेत. हिमाचल प्रदेशामध्ये मध्यंतरी 2500 कोटींचा बिटकॉईन घोटाळा उघडकीस आला होता. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली भारतातीलच नव्हे तर जगभरातील हजारो लोकांना 200 कोटींहून अधिक रुपयांसाठी फसवणार्या टोळीचा मध्यंतरी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला होता. सोलापुरात सीसीएच या अमेरिकन अॅपमध्ये गुंतवणूक करणार्या डॉक्टर, वकील, व्यापारी आदी नागरिकांचे 1000 कोटी रुपये बुडाल्याची माहिती समोर आली होती. क्रिस्टीन लिगार्ड यांचा मुलगा असो किंवा सामान्य नागरिक असो; आर्थिक नुकसान होणे हे प्रत्येकासाठी क्लेशदायक असते. परंतु खुद्द शासनव्यवस्था जेव्हा एखाद्या गुंतवणुकीबाबत हमी घ्यायला तयार नसते, त्यामध्ये प्रचंड जोखीम आहे असे सांगत असते, त्या गुंतवणुकीला अधिमान्यता नसल्याचे जाहीर करते तेव्हा तरी आपले डोळे उघडायलाच हवेत. अन्यथा डोळे असूनही श्रीमंतीच्या लालसेपोटी आलेला आंधळेपणा आणि विचारशून्यता आयुष्य उद्ध्वस्त करणारी ठरू शकते.
The post क्रिप्टो करन्सीचे मायाजाल appeared first on पुढारी.
क्रिप्टो करन्सीच्या दुष्टचक्रात आजवर जगभरातील अनेकजण अडकले आहेत. अगदी युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष क्रिस्टिन लिगार्ड यांचा मुलगाही त्याला अपवाद ठरला नाही. क्रिप्टोमधील चढउतारांचा अंदाज त्याला येऊ शकला नाही आणि जवळपास 60 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक गमावण्याची वेळ त्याच्यावर आली. लिगार्ड यांचा मुलगा असो किंवा सामान्य नागरिक असो; आर्थिक नुकसान होणे हे प्रत्येकासाठी क्लेशदायक असते. प्राचीन काळात …
The post क्रिप्टो करन्सीचे मायाजाल appeared first on पुढारी.