शरद पवारांनीच भाजपसोबत जायला सांगितले; अजित पवारांचा गौप्यस्फोट
चंदन शिरवाळे
कर्जत : मला सत्तेत जायला शरद पवार यांनीच सांगितले होते. मी राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देतो. तू भाजपसोबत जा, असे त्यांनी सांगितल्याने आम्ही भाजपसोबत सत्तेत गेलो, असा खळबळजनक खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केला. शरद पवार यांच्या राजीनामानाट्याचाही पर्दाफाश करीत अजित पवारांनी आपल्या काकांवर कोणताही आडपडदा न ठेवता थेट हल्ला चढवला. राजीनामा देतो म्हणून सांगितले आणि पुन्हा राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन करायलाही लावले. आम्हाला असेच सतत गाफील ठेवले गेले, अशी तक्रारही अजित पवार यांनी केली. (Maharashtra Politics)
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दोन दिवसांचे शिबिर कर्जत येथे झाले. याच शिबिरात अजित पवार यांनी लोकसभा निेवडणुकीच्या
रणधुमाळीत पवारांचा कुटुंबकलह विकोपाला जाणार याचे स्पष्ट संकेत देत शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जोरदार भूमिका मांडली.
अजित पवार म्हणाले, मी 32 वर्षांपासून मंत्री म्हणून काम करीत आहे. त्यामुळे मला कामाचा चांगला अनुभव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझ्या अध्यक्षतेखाली काम करत आहे, अशी वर्तमानातून सुरुवात करत अजित पवारांनी मग शरद पवारांनी घडवलेल्या राजीनामानाट्यावरील पडदा वर करण्यास सुरुवात केली. खरे तर शरद पवारांनीच मला मी राजीनामा देतो, तू अध्यक्ष हो, असे सांगितले. भाजपसोबत जाण्याचा सल्लाही त्यांनीच दिला. त्यानुसारच आम्ही सत्तेत गेलो.
सुप्रियाशीही चर्चा झाली
अजित पवार सांगू लागले, म्हणाले, नीट ऐका. मी स्वत:, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक-निंबाळकर, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे असे आम्ही दहा-बाराजण देवगिरीला बसलो होतो. आमच्यासोबत अनिल देशमुखही येणार होते. मात्र त्यांना मंत्रिपद मिळत नसल्याने ते आले नाहीत.
भाजपसोबत जायचे पण कसे जायचे याचा विचार सुरू होता. डायरेक्ट साहेबांना सांगितले तर त्यांना काय वाटेल हा प्रश्न होता. म्हणून आम्ही सुप्रिया सुळेंना बोलावून घेतले. आम्ही कशासाठी बोलावले हे मात्र सांगितले नव्हते. तिला आम्ही म्हणालो, सर्व जीवाभावाचे सहकारी आहेत. लोकशाहीत बहुमताचा आदर करावा लागतो. तरच संघटना पुढे जाते. (सुप्रियांना विषय समजला) त्या म्हणाल्या, मला सात ते दहा दिवस द्या. मी साहेबांना कन्व्हिन्स करते. काय करायचे ते माझ्यावर सोपवा.
थेट साहेबांकडे गेलो
अजित पवार आता कहानी पुढे नेऊ लागले. म्हणाले, आम्ही सात-आठ दिवस थांबलो. पुन्हा आम्ही एकत्र बसलो. जयंत पाटील, अनिल देशमुख होते. भाजपसोबत सरकारमध्ये गेले पाहिजे. आमदारांच्या कामांना स्थगिती मिळाली आहे. अनेक प्रश्न आहेत. याचा विचार आम्ही केला आणि मग विचार करून डायरेक्ट साहेबांकडे गेलो आणि त्यांना आमचा निर्णय सांगितला.
ते म्हणाले, ठीक आहे. बघू काय करायचे ते. पुन्हा आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला गेलो. वेळ जात होता. आम्ही म्हणालो, वेळ जातोय, निर्णय घ्या. दरम्यान, 1 मे होता. त्यांनी मला बोलावून सांगितले की, सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. निर्णयाला उशीर झाल्याचे कारणही त्यांनी दिले. 1 मे रोजी झेंडावंदन होते आणि 2 तारखेला पुस्तक प्रकाशन होते. असेही ते म्हणाले.
सुप्रिया, जयंत पाटलांच्या उपस्थितीत निर्णय झाला
शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील या सर्वांच्या उपस्थितीत पक्षाच्या बैठकीत भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय झाला होता. मागाहून तो फिरवला गेला. मग राजीनाम्याचे नाटक करून राजीनामा मागे घेण्याचे आंदोलनही उभे केले गेले. कोर्टबाजीत तुम्ही पडू नका, असे सांगून आम्हाला गाफील ठेवले आणि शरद पवार यांनीच न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. तरीही आम्ही डगमगणार नाही. त्यामुळे आम्ही आता आमच्या वाटेने पुढे जाऊ आणि आम्हीच ही लढाई जिंकू, असा दावा अजित पवार यांनी केला.
आरोप सिद्ध करा
आमच्यावरील केसेसमुळे आणि गैरव्यवहारांच्या आरोपाला घाबरून आम्ही भाजपबरोबर सत्तेत सहभागी झालो, असा आरोप केला जातो. मात्र हे खोटे आहे. राजकारणात काम करताना आरोप होत असतात. पण ते सिद्ध झाले पाहिजेत. तरच त्याला अर्थ आहे. आता मी वारंवार त्याबाबत बोलणार नाही. आता आपल्याला मागे नाही, तर पुढे जायचे आहे. पक्ष संघटना मजबूत करायची आहे, असे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना अजित पवारांनी केले.
मी नेहमीच राज्याचा सर्वांगीण विकास करण्याला प्राधान्य दिले. माझ्या 32 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, कामे केली. काही वेळेस प्राप्त परिस्थितीनुसार राजकीय निर्णय घ्यावे लागतात. याचा अर्थ आम्ही आमच्या विचारांशी, विचारधारेशी तडजोड केली, असा अर्थ त्याचा होत नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
‘इंडिया’ आघाडीवर हल्लाबोल
नरेंद मोदी यांना तिसर्यादा पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीची निर्मिती करण्यात आली. मात्र त्या नेत्यांमध्येसुद्धा एकमत नाही. ते सर्व गोंधळलेल्या स्थितीत आहेत. विचार करायला लावणारी बाब म्हणजे आहे जे इंडिया आघाडीत जाऊन आता भाजपला विरोध दर्शवितात, यातील बहुतेक पक्ष आणि त्यांची नेतेमंडळी यापूर्वी कधी ना कधी केंद्रात, राज्यात भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाली होती, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
मार्चमध्ये आचारसंहिता
आम्ही भाजपसोबतच्या महायुतीमध्ये कायम राहणार आहोत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमचा पक्ष पूर्ण प्रयत्न करत आहे. महायुतीत कोणतीही नाराजी नाही. आम्ही निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागेल. त्यापूर्वी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होईल, असे सांगून अजित पवार यांनी शिबिरात पक्षाची पुढील वाटचाल, सत्तेतील वाटा या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले.
घरातल्या गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही : जयंत पाटील
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, अजित पवार हे घरातील गोष्टी बाहेर सांगत आहेत. घरातल्या गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही. शरद पवार-अजित पवार यांच्यात काय चर्चा झाली, हा त्यांचा प्रश्न आहे. पण, माझ्या घरी बैठक झाली नाही. अजित पवार चार महिन्यांनंतर या गोष्टी बोलत आहेत. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. (Maharashtra Politics)
शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यात बैठकीतच सत्तेत जाण्याचा निर्णय झाला. राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन करण्याचा आदेश त्यांनीच दिला होता.
– अजित पवार
संबंधित बातम्या :
Maharashtra Politics : दीपक केसरकर यांनी घेतली शरद पवारांची भेट: चर्चांना उधाण
Maharashtra Politics : “माफीनामा…! असे ओरडत भाजपने…” : सुप्रिया सुळेंचा हल्लाबाेल
Ajit Pawar : आम्हाला कायम गाफील का ठेवले ? : अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
The post शरद पवारांनीच भाजपसोबत जायला सांगितले; अजित पवारांचा गौप्यस्फोट appeared first on पुढारी.
कर्जत : मला सत्तेत जायला शरद पवार यांनीच सांगितले होते. मी राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देतो. तू भाजपसोबत जा, असे त्यांनी सांगितल्याने आम्ही भाजपसोबत सत्तेत गेलो, असा खळबळजनक खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केला. शरद पवार यांच्या राजीनामानाट्याचाही पर्दाफाश करीत अजित पवारांनी आपल्या काकांवर कोणताही आडपडदा न ठेवता थेट हल्ला चढवला. राजीनामा देतो म्हणून …
The post शरद पवारांनीच भाजपसोबत जायला सांगितले; अजित पवारांचा गौप्यस्फोट appeared first on पुढारी.