एक कॉल आला अन् नीट घोटाळ्याचा भांडाफोड झाला!
मुंबई : Bharat Live News Media डेस्क : नीट-यूजी पेपरफुटीचा घोटाळा उघडकीस येण्यासाठी एका अनामिकाचा कॉल आरंभबिंदू ठरल्याची माहिती समोर आली आहे. ५ मे रोजी नीट-यूजी परीक्षा सुरू होण्याच्या तीन तास आधी पोलिसांना त्या अनामिकाने ‘चार संशयित आरोपी एसयूव्हीतून सेफ होमकडे निघाले आहेत’, असा कॉल केला आणि काही मिनिटांतच बिहार पोलिसांनी या चौघांच्या मुसक्या आवळल्या, असे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी या चौघांना पकडल्यानंतर पाटणाच्या सीमेवर असलेल्या रामकृष्ण नगरमधील इमारतीत नेले. येथे नीट-यूजी परीक्षेच्या तयारीसाठी ३० विद्यार्थी जमले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी ३० ते ५० लाख रुपये अदा करून फुटलेली प्रश्नपत्रिका मिळवली होती. पोलिसांना आतापर्यंत या प्रकरणात फुटलेली प्रश्नपत्रिका मिळवणारे विद्यार्थी व त्यांच्या डझनभर हँडलर्सची नावे मिळाली आहेत. हे नेटवर्क अनेक राज्यांत पसरलेले असून, सर्व प्रकरणाचा उलगडा होण्यास थोडा वेळ लागेल, असे आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.
पाटणात अटक केलेल्या चौकडीवर विद्यार्थ्यांकडून रात्रभर उत्तरे पाठ करून घेणे आणि त्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्याची जबाबदारी होती. या प्रकरणात पहिल्या अटकेनंतर टाकलेल्या छाप्यादरम्यान पोलिसांना सेफ हाऊसमध्ये १३ रोल नंबर सापडले. चार इच्छुकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीतून पोलिसांना आणखी नऊ नावे मिळाली. यात दानापूर नगर परिषदेतील कनिष्ठ अभियंता सिकंदर यादवेंदू याचाही समावेश होता. छाप्यांदरम्यान पोलिसांनी अनेक कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोठी रोख रक्कमही जप्त केली.
यादवेंदूने ४ मे रोजी इच्छुकांना फुटलेली प्रश्नपत्रिका पुरवल्याचा आरोप आहे. ६ मे रोजी पोलिसांनी यादवेंदूच्या फ्लॅटमधून जळालेल्या प्रश्नपत्रिका जप्त केल्या. दुसऱ्या दिवशी काही इच्छुकांच्या पालकांसह १३ जणांची चौकशी करण्यात आली. ११ मे रोजी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवून तपासाचे नेतृत्व युनिटचे डीआयजी मानवजीत सिंग धिल्लन यांच्याकडे सोपविण्यात आले. यादवेंदूचा दानापूर येथील १९ वर्षीय पुतण्या अनुराग यादव यालाही अटक झाली आहे. त्याने परीक्षेच्या एक दिवस आधी प्रश्नपत्रिका मिळाल्याचे सांगितल्याने पेपर फुटीचा संशय वाढला.
फुटलेला पेपर ३० ते ४० लाख रुपयांत विकल्याचे त्याने सांगितल्याने पोलिसांनी कोचिंग इन्स्टिट्यूटचे मालक, शिक्षक आणि या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या काही विद्यार्थ्यांना अटक केली. यादवेंदू व त्याचे दोन साथीदार नितीश कुमार व अमित आनंद यांनीही पेपरफुटीत सहभागाची कबुली दिली आहे. अनुराग सेफ हाऊसमध्ये जाण्यापूर्वी यादवेंदूने सोय केलेल्या गेस्ट हाऊसमध्ये थांबला होता. अमित व नितीश यांना परीक्षेच्या एक दिवस आधी (४ मे) हजारीबाग येथील परीक्षा केंद्रातून व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या. ‘प्रश्नपत्रिकांच्या फोटोकॉपी विद्यार्थ्यांना देऊन त्यांना उत्तरे लक्षात ठेवण्यास सांगण्यात आले. डुप्लिकेट प्रश्नपत्रिका सकाळी जमा करून जाळण्यात आल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
आम्हाला मिळालेली टीप अत्यंत बरोबर ठरली. पण ही टीप नीट-यूजी पेपरफुटीचा घोटाळा उघडकीस आणणारी ठरेल, अशी अपेक्षा आम्हालाही नव्हती. आम्ही प्रकरणाच्या खोलवर जात राहिलो. प्रत्येक क्ल्यू एकत्र केला. त्याचे परिणाम समोर येत आहेत. मात्र, अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे.
– अमर कुमार, एसएचओ, शास्त्रीनगर पोलीस ठाणे