धाराशिव: भोत्रा येथे वाळू उपशावरुन वाद; गोळीबारात एकजण जखमी
परंडा, Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील भोत्रा येथील सीना नदी पात्रात वाळू उपशावरुन वाद झाल्याने वाळू माफियांच्या दोन गटात आज (दि. २२) वाद होऊन गोळीबार करण्यात आला. यात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीचा शोध सुरु केला आहे.
योगेश हनुमंत बुरंगे (रा. परंडा) यांच्या कमरेला गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. कपील आजिनाथ अलबत्ते यांना डोक्यात दगड लागल्याने जखमी झाले आहेत. त्यांना बार्शी येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाळू उपशाच्या कारणावरून दोन गटात वाद झाल्याने ही गोळीबाराची घटना घडली आहे. घटणा परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारात सीना नदी पात्रात साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा गोळीबार का झाला, वादाचे नेमके कारण काय, याबाबतचा तपशील मिळविण्याचे काम पोलीस करत आहेत.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या परंडा तालुक्यात खुलेआम गोळीबार झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चेत आला आहे. उशीरापर्यंत परंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. संशयित आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा
NEET Exam 2024 : नीट परिक्षा पुन्हा घ्या; धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांची मोर्चाद्वारे मागणी
धाराशिव : महामार्गाच्या गलथान कारभारामुळे अणदूरकरांचे लाखोचे नुकसान
धाराशिव : उमरगा शहरासह तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी