नक्षल्यांचा प्रमुख नेता गिरीधरचे फडणवीसांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

नक्षल्यांचा प्रमुख नेता गिरीधरचे फडणवीसांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

गडचिरोली, Bharat Live News Media वृत्तसेवा : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीतील राजकीय आणि लष्करी हालचालींचा प्रभारी आणि वरिष्ठ नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर उर्फ बिच्चू याने शनिवारी (दि.२२) पत्नी संगीता हिच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.
१९९६ मध्ये नक्षल चळवळीत भरती झालेल्या गिरीधरने विविध दलममध्ये काम केल्यानंतर विभागीय समिती सदस्य, कंपनी क्रमांक चारचा कमांडर, दंडकारण्य स्पेशल झोनल समिती सदस्य, कंपनी क्रमांक १० चा प्रभारी तसेच दक्षिण गडचिरोली विभागीय समितीचा सचिव म्हणून काम केले आहे. नक्षल्यांच्या राजकीय आणि लष्करी हालचालींचा प्रभारी म्हणून गिरीधरची ओळख होती. गिरीधरवर १७९ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात ८६ चकमकी व १५ जाळपोळीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
२०१८ मध्ये भामरागड तालुक्यातील कसनासूर येथे झालेल्या चकमकीत सिनू, सतीश, यांच्यासह अनेक नक्षली नेत्यांसह ४० नक्षली ठार झाले होते. त्यानंतर विभागीय समिती सचिव भास्कर, २०२२ मध्ये केंद्रीय समिती सदस्य मिलिंद तेलतुंबडे, मे २०२४ मध्ये वरिष्ठ नक्षली जोगन्ना ठार झाला होता. २०१९ मध्ये ज्येष्ठ नक्षली नर्मदाक्का हिला पोलिसांनी अटक केली होती. मागील वर्षी तिचा कारागृहात मृत्यू झाला. या घटनांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळ खिळखिळी झाली होती. त्यामुळे गिरीधर हा एकमेव नक्षल नेत्यावर नक्षल्यांची धुरा होती. परंतु आज त्याने आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला हादरा बसला आहे.
गिरीधरची पत्नी संगीता उर्फ ललीता चैतू उसेंडी ही २००६ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाली. २०११ ते मे २०२० पर्यंत ती छत्तीसगडमधील माड दलममध्ये कार्यरत राहिली. त्यानंतर जून २०२० मध्ये तिची दक्षिण गडचिरोलीत बदली होऊन तिला भामरागड दलममध्ये विभागीय समिती सदस्यपदी बढती मिळाली. तिच्यावर १८ गुन्ह्यांची नोंद असून, त्यात चकमकी आणि जाळपोळीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने तिच्यावर १६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाचे पुस्तक, शाल आणि श्रीफळ देऊन दोघांचाही सत्कार केला.
नक्षली संविधानाला मानत नाही म्हणून आमचा विरोध: देवेंद्र फडणवीस
नक्षलवाद्यांचा संविधानावर विश्वास नाही. ते हिंसेवर विश्वास ठेवून निरपराध नागरिकांचा बळी घेतात. त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. पोलिसांनी सोशल पोलिसींगद्वारे शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिल्याने दुर्गम भागातील आदिवासींना नक्षल्यांपेक्षा पोलिस जवळचे वाटतात. म्हणून आत्मसमर्पण करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गिरीधर हा मोठा नक्षल नेता मुख्य प्रवाहात आल्याने नक्षल चळवळ जवळपास संपली आहे, असे फडणवीस म्हणाले. याप्रसंगी विविध चकमकींमध्ये धाडसी कामगिरी केल्याबद्दल अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, सी-६० पथकाचे कमांडर वासुदेव मडावी, समय्या आसम यांचाही फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आ.कृष्णा गजबे, आ.डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय दैने, माजी खासदार अशोक नेते, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.