वारणा पूल ‘नॉट आऊट १४४’: स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार अजूनही भक्कम

किणी: स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या कोल्हापूर- सांगली जिल्ह्यांना महामार्गाने जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन वारणा नदीवरील  पुलाने (Warna Bridge)  आज तब्बल १४४ वर्षे पूर्ण करून शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल सुरू केली आहे. स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेल्या व आतापर्यंत कोट्यवधी वाहनांचा भार सोसलेल्या या पुलाचा दिमाख मात्र ‘अभी तो मै जवान हूं’ असाच आहे. या पूलाची अशी आहेत  वैशिष्ट्ये: ब्रिटिशकालीन …
वारणा पूल ‘नॉट आऊट १४४’: स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार अजूनही भक्कम

राजकुमार. बा.चौगुले

किणी: स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या कोल्हापूर- सांगली जिल्ह्यांना महामार्गाने जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन वारणा नदीवरील  पुलाने (Warna Bridge)  आज तब्बल १४४ वर्षे पूर्ण करून शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल सुरू केली आहे. स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेल्या व आतापर्यंत कोट्यवधी वाहनांचा भार सोसलेल्या या पुलाचा दिमाख मात्र ‘अभी तो मै जवान हूं’ असाच आहे.
या पूलाची अशी आहेत  वैशिष्ट्ये:

ब्रिटिशकालीन वारणा नदीवरील पुलाला तब्बल १४४ वर्षे पूर्ण
जानेवारी १८७६ मध्ये पुलाच्या बांधकामास सुरुवात
बांधकामासाठी दगड, माती व शिसे याचा वापर
पुलास प्रत्येकी ४५ मीटर रुंदीचे आठ गाळे
प्रत्येक वक्राकार गाळ्याला ‘कि स्टोन’ आहे.

Warna Bridge  : मुंबई- बेंगळूर-चेन्नई महानगरांना जोडण्यास महत्त्वाची भूमिका
मुंबई- बेंगळूर-चेन्नई या महानगरांना जोडणाऱ्या पूर्वीच्या राष्ट्रीय व आता आशियाई महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्याचे महत्व ब्रिटिशकालीन राजवटीतही अनन्यसाधारण महत्व होते. ब्रिटिश फौजा, टपाल, विविध प्रकारचे जीवनोपयोगी साहित्याची वाहतूक याच मार्गाने केली जात असे. याच मार्गाशेजारी तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांना राहण्यासाठी प्रवासातील विश्रांतीसाठी अनेक ठिकाणी रेस्ट हाऊस (विश्रांतीगृहे) बांधण्यात आली होती. अनेक ठिकाणी आजही ती भक्कमपणे उभी आहेत.
सर फिलिप वुड या गव्हर्नरच्या काळात पुलासाठी सर्वेक्षण
दळणवळणासाठी उपयुक्त असणाऱ्या वारणा नदीवर पुलाची गरज ओळखून ब्रिटिश राजवटीने सर फिलिप वुड या गव्हर्नरच्या काळात जानेवारी १८७६ मध्ये या पुलासाठी सर्वेक्षण करून बांधकामास सुरुवात केली. हे काम एका ब्रिटिश कंपनीलाच देण्यात आले होते. दगड, माती व शिसे याचा वापर बांधकामासाठी करण्यात आला होता. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेला या पुलास प्रत्येकी ४५ मीटर रुंदीचे आठ गाळे आहेत. सर्व गाळे हे भक्कम दगडात बांधले असून प्रत्येक वक्राकार गाळ्याला ‘कि स्टोन’ आहे. याच कि स्टोन द्वारे हे गाळे भक्कम करण्यात आले आहेत.
Warna Bridge  : २० जून १८८१ ला पूल वाहतुकीसाठी खुला
४०० मीटर लांबीच्या या पुलाचे काम १८८१ ला पूर्ण झाले. सर जेम्स फर्ग्युसन यांच्या कारकिर्दीत पूर्णत्वास गेलेल्या या पुलाचे २० जून १८८१ ला उद्घाटन करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पूल उभारताना त्याचे जीवनमान १०० वर्षे गृहीत धरण्यात आले होते. ही मुदत संपल्यानंतर हा पूल कालबाह्य झाल्याचे संबंधित ब्रिटिश शासनाने व कंपनीने शासनास कळविले आहे. पुणे-बंगळुरू महामार्गाच्या रुंदीकरणावेळी जुन्या वारणा पुलाला समांतर नवीन पूल बांधण्यात आला. पण पुण्याकडे जाणाऱ्या लेनसाठी जुन्याच महामार्गाचा वापर करण्यात येत आहे. आता मात्र, या पुलाला समांतर असा आणखी एक पूल बांधण्यात येत आहे. यामुळे या पुलावरील वाहतूक कमी होणार असली तरी याचे महत्व मात्र अबाधित राहील, यात शंकाच नाही.
महाड दुर्घटनेनंतर स्ट्रक्चरल ऑडिट
२ ऑगस्ट २०१६ मध्ये महाडच्या सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर राज्यातील सर्वच ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार या पुलाचे व्ही जे टी इन्स्टिट्यूट (मुंबई) या संस्थेकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले. यासाठी अत्याधुनिक चाचणी यंत्राद्वारे पुलाच्या स्थितीचे अवलोकन करण्याबरोबरच पुलाची भार सोसण्याची क्षमताही (स्पॅन लोड टेस्ट) तपासण्यात आली. यानंतर हा पूल भक्कम असल्याचा निर्वाळा देण्यात आला.
चळवळीच्या टार्गेटवर ‘वारणा पूल’
भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भूमिगत चळवळीतील स्वातंत्र्यवीरांनी ब्रिटिशांची दळणवळण यंत्रणा खिळखिळी करण्यासाठी वारणा पूल स्फोटांनी उडविण्याची योजना आखली. दिवंगत वसंतदादा पाटील (माजी मुख्यमंत्री) आणि किणी येथील कॅप्टन शामराव पाटील यांनी ही जबाबदारी उचलली. स्फोटके तयार करण्यासाठी लागणारे साहित्य किणी येथे पोहोच झाले. स्फोटके तयार करण्याचे काम सुरू असतानाच बातमी लिक झाली आणि ब्रिटिश पोलिसांनी त्या जागेवर धाड टाकून साहित्य ताब्यात घेतले. मात्र, वसंतदादा आणि कॅप्टन पोलिसांच्या हातावर तुरी देत भूमिगत झाले. नाहीतर हा पूल १९४२ सालीच नष्ट झाला असता.
हेही वाचा 

कोल्हापूर: ‘बिद्री’च्या इथेनॉल प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड
कोल्हापूर : कुस्तीपटू गौरी पुजारी हिचे निधन
कोल्हापूर : पेठवडगाव येथील अपघातात सावर्डेच्या तरुणाचा मृत्यु