ENG vs SA : दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला हरवले; ब्रूक-लिव्हिंगस्टोनची झुंज व्यर्थ
सेंट लुसिया, वृत्तसंस्था : सुपर-8 फेरीच्या दुसर्या दिवशी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 7 धावांनी हरवले. क्विंटन डी कॉकच्या 65 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 6 बाद 163 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडची टॉपऑर्डर ढेपाळली, तरी हॅरी ब्रूक (53) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (33) यांनी 78 धावांची भागीदारी करून इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. परंतु, दक्षिण आफ्रिकेच्या रबाडा, जान्सेन आणि नोर्त्जे या गोलंदाजांनी शेवटच्या तीन षटकांत चुरशीची झुंज देत इंग्लंडला विजयापासून वंचित ठेवले.
सेंट लुसियाच्या डॅरेल सॅमी नॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या आघाडी फळीला चांगली सुरुवात करता आली नाही. फिल सॉल्ट (11), जोस बटलर (17), जॉनी बेअरस्टो (16) आणि मोईन अली (9) हे चौघे तंबूत परतले तेव्हा इंग्लंडच्या फक्त 61 धावा झाल्या होत्या; पण त्यानंतर हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांची जोडी जमली. दोघांनी चेंडू आणि धावा यांच्यातील अंतर हळूहळू कमी केले. डावाचे 17 वे षटक इंग्लंडसाठी फायद्याचे ठरले. बार्टमॅनच्या या षटकात 21 धावा निघाल्याने शेवटच्या 18 चेंडूंत 25 धावांचे टार्गेट उरले.
सामना पूर्णपणे इंग्लंडच्या हातात गेला, असे वाटत असताना अठराव्या षटकात रबाडाने लिव्हिंगस्टोनला (33) बाद केेले आणि या षटकात फक्त 4 धावा दिल्या. त्यामुळे 12 चेेंडूंत 21 धावा असे समीकरण उरले. 19 व्या षटकात जान्सेनने 7 धावा दिल्या. शेवटच्या 6 चेेंडूंत इंग्लंडला विजयासाठी 14 धावांची आवश्यकता होती.
एन्रिच नोर्त्जेच्या पहिल्या चेंडूवर खतरनाक हॅरी ब्रूक (53) बाद झाला. मार्करामने मागे पळत जात त्याचा उत्कृष्ट झेल टिपला. दुसर्या चेेंडूवर एकेरी धाव, तर तिसर्या चेंडूवर चौकार मिळाला. नोर्त्जेने पुढील 3 चेंडूंत एकच धाव दिल्याने इंग्लंडचा प्रयत्न अपुरा पडला. त्यांच्या 20 षटकांत 6 बाद 156 धावा झाल्या.
तत्पूर्वी, इंग्लंडने सुपर-8 च्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागील सामन्यात फॉर्म गवसलेल्या क्विंटन डी कॉकने इंग्लिश गोलंदाजांना हैराण केले. आफ्रिकेने पॉवर प्लेमध्ये 63 धावा केल्या. क्विंटनने 22 चेंडूंत अर्धशतक झळकावले. जोफ्रा आर्चरने त्याची विकेट मिळवून दिली. क्विंटनने 38 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारांसह 65 धावा केल्या. संघाच्या 92 धावांवर क्विंटनची विकेट पडल्यानंतर आफ्रिकेच्या डावाला गळती लागली.
हेन्रिक क्लासेन (8) व डेव्हिड मिलर यांची जोडी दुर्दैवाने तुटली. व्हाईड बॉलवर नॉन स्ट्रायकर एंडवरून मिलरने एक धावेसाठी कॉल दिला आणि क्लासेन पळाला. यष्टिरक्षक जोस बटलरने अचूक थ्रो करून क्लासेनला रन आऊट केले. आदिल राशीदच्या फिरकीवर कर्णधार एडन मार्कराम (1) त्रिफळाचीत झाला. डेव्हिड मिलरने 28 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 43 धावांची फटकेबाजी करून संघाला सावरले. जोफ्रा आर्चरने 20 व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर विकेटस् घेतल्या. आफ्रिकेला 6 बाद 163 धावा करता आल्या.