हंगामी लोकसभा अध्यक्षांच्या नियुक्तीवरून वाद
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : संसदेचे पहिले अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हंगामी लोकसभा अध्यक्षांच्या नियुक्तीवरून वाद सुरू झाल्याचे बघायला मिळाले आहे. भाजपने हंगामी लोकसभा अध्यक्षपदी खासदार भतृहरी मेहताब यांची नियुक्ती केली. मेहताब यांना शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी या पदाची शपथ दिली. मात्र, काँग्रेसने मेहताब यांच्या नियुक्तीला विरोध केला आहे.
मेहताब यांची हंगामी लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती करून भाजपने सांसदीय परंपरेचे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. सांसदीय परंपरेनुसार लोकसभेत सर्वाधिक काळ खासदार असलेल्या व्यक्तीची हंगामी लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली जाते. मात्र, रालोआ सरकारने या पदासाठी ज्येष्ठ खासदाराला डावलून सांसदीय परंपरेचे उल्लंघन केल्याचे रमेश यांनी म्हटले आहे.