भंडारा: बेटाळा येथे जि.प.सदस्याची वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण
भंडारा: Bharat Live News Media वृत्तसेवा: मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन पाचघरे यांना जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी मारहाण केली. या प्रकरणी राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने या मारहाणीचा निषेध करत कारवाईची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अतुलकुमार टेंभुर्णे यांना दिले.
बुधवारी (दि. १९) बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. पाचघरे हे कार्यरत असताना जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी कोणतेही कारण नसताना डॉ. पाचघरे यांना मारहाण केली. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यां कडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य न करता सूडभावनेतून मारहाण, मानसिक त्रास व जीवितहानीची भीती निर्माण करण्यात येत आहे. या संदर्भात डॉ. पाचघरे यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
मॅग्मा संघटनेने जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांना गुरूवारी देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. मधुकर कुंभरे, डॉ. शंकर कैकाडे, डॉ. एम. पी. मोटघरे, डॉ. पवन पाचघरे, डॉ. व्ही. पी. मेश्राम, डॉ. रेखा रामटेके व सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा
भंडारा : वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू
भंडारा : दोघांकडून सीआरपीएफ जवानाला मारहाण
भंडारा : विद्यार्थीनीचे शारीरिक शोषण, २ महिन्याची गर्भवती; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल