रील्स तयार करताना कार कोसळली दरीत; तरुणी ठार
छत्रपती संभाजीनगर : रील बनवण्याचा हट्ट एका युवतीच्या थेट जीवावर बेतला आहे. कार चालवता येत नसतानाही केवळ रील बनवण्याच्या मोहासाठी तिने स्टेअरिंग हाती घेतले. त्यात रिव्हर्स गिअर पडून कार थेट दरीत कोसळली. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. श्वेता सुरवसे असे मयत तरुणीचे नाव आहे. सोमवारी (17 जून) दुपारच्या वेळी दौलताबाद परिसरातील शुलिभंजन येथे दत्तमंदिराच्या पटांगणातच हा प्रकार घडला.
श्वेता व तिचा मित्र शिवराज मुळे (25, रा.जयभवानीनगर) हे दोघे सुटी असल्याने शुलिभंजन परिसरात फिरण्यासाठी गेले. त्याठिकाणी श्वेता हिने कार चालवताना आपला रील बनवण्याचा हट्ट केला. तिने गाडीचे स्टेअरिंग हाती घेतले. मित्र शिवराज बाहेर उभा राहून व्हिडीओ घेत होता. त्यावेळी कार चालवता येत नसल्याने श्वेताकडून रिव्हर्स गिअर पडला आणि क्लच ऐवजी एक्सलेटर दाबल्याने गाडीने वेग घेतला. त्यामुळे पाठीमागे काही अंतरावर असलेल्या दरीत कार कोसळली. यात श्वेताचा जागीच मृत्यू झाला.