सोलापूर : बाळाचा मृतदेह गायब प्रकरणात नरबळीची शक्यता

सोलापूर : बाळाचा मृतदेह गायब प्रकरणात नरबळीची शक्यता

सोलापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मोदी स्मशानभूमीत दफन केलेल्या 10 महिन्यांच्या बाळाचा मृतदेह गायब प्रकरणात पोलिसांचा तपास चालू आहे. बाळाचे कपडे सापडले आहेत; मात्र मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलिस कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणात नरबळीची शक्यता असल्याची माहिती पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी पत्रकारांना दिली.
मोदी स्मशानभूमीमध्ये दोन दिवसांपूर्वी दफन केलेल्या 10 महिन्यांचा बाळाचा मृतदेह गायब झाल्याची घटना रविवारी (दि. 16) उघडकीस आली होती. प्रियांश वाघमारे असे मृत बाळाचे नाव आहे. प्रियांशचा मृतदेह गायब झाल्यानंतर सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून तपास सुरू केला आहे. तपासामध्ये अद्याप काही हाती लागलेले नाही; मात्र मृतदेहावरील कपडे हाती लागले आहेत. त्याद़ृष्टीने तपास सुरू आहे. मृतदेहाचे अद्याप अवयव सापडलेले नाहीत. श्वान पथकाच्या माध्यमातूनही तपास चालू आहे. तपासाअंती सर्वकाही लवकरच पुढे येईल, असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले. कोणत्या तरी जनावराने उकरून मृतदेह नेला का, या दोन्ही द़ृष्टिकोनातून तपास केला जात आहे. अद्याप तपासाला यश आलेले नाही; मात्र लवकरच योग्य तो तपास केला जाईल. नरबळीची शक्यता असण्याचेही पोलिस आयुक्तांनी यावेळी सांगितले.
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
प्रियांश वाघमारेच्या डोक्याला मार लागल्यामुळे सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर नातेवाईकांनी मोदी स्मशानात बाळाचा दफनविधी केला होता. जनावरांनी उकरून मृतदेह घेऊन जाऊन नये म्हणून त्यावर मोठे दगड, फरशी आणि काटेरी फांद्या देखील ठेवल्या होत्या. मात्र हे सर्व सर्व काढून मृतदेह गायब झाल्याने मोठी खळबळ माजली आहे. त्याच्या तपासाचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.