पिंपळनेरकर पिताय पिवळं पाणी, दीड महिन्यापासून दूषित पाण्याचा पुरवठा
पिंपळनेर, (जि. धुळे) Bharat Live News Media वृत्तसेवा- शहरातील नागरिकांना पिण्यासाठी नगर परिषदेकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, गेल्या एक ते दीड महिन्यापासून पिवळ्या रंगाचा पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नगर परिषदेने तत्काळ उपाययोजना करून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
नळाला पाणी पिवळ्या रंगाचे येत असल्याने नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना न करण्यात आल्यामुळे पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. घरगुतीसह अनेक लहान-मोठे व्यावसायिक याच पाण्याचा वापर करीत असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहिल्यादांच अशा प्रकारे पिंपळनेर शहरात पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाण्याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. दरम्यान,सध्या नगर परिषदेवर प्रशासक असल्याने शहरातील विविध समस्याही निर्माण झालेल्या आहेत. या पिवळसर पाण्याबाबत काही नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह नगर परिषदेकडे तक्रारी केल्या असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, काही महिन्यांपासून शहराला स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी नगर परिषदेतर्फे शहरातील गल्लीबोळांत पाइपलाइन करण्यात आली आहे. नागरिकांनी यासाठी हजार रुपये शुल्क देऊन नवीन नळ जोडणी केली आहे. मात्र, अद्याप त्यांना स्वच्छ पाणी मिळत नसल्यामुळे प्रशासकीय अधिकारी काही निर्णय घेतील का? नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल का?असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.
एक ते दीड महिन्यापासून नळांना पिवळ्या रंगाचे पाणी येत असून, ते पाणी पिण्यास योग्य नाही. मात्र, पर्याय नसल्याने तेच पाणी गाळून भरण्यात येते आणि तेच पाणी प्यावे लागत आहे.
-प्रथम भामरे, रहिवासी.
एक ते दीड महिन्यापासून पिण्यासाठी किंवा घरात वापरण्यासाठी अक्षरशः घाणेरडे पिवळ्या रंगाचे पाणी नळाला येत आहे. नगर परिषद याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांना याच पाण्याचा वापर करावा लागत आहे. तरी नगर परिषदेने स्वच्छ पाणी देण्याची गरज आहे.
-विशाल कासार, रहिवाशी
धरणात पाणी कमी आहे जे पाणी आहे, त्यातही लाटा तयार होतात. त्यामुळे पाणी घडूळ होऊन पाणी खराब होते. नागरिकांना पाणी स्वच्छ मिळावे, यासाठी प्रक्रिया करीत आहोत. तरी येत्या दोन तीन दिवसात पाणी स्वच्छ देण्याचा प्रयत्न आहे.
-दीपक पाटील, प्रशासकीय अधिकारी, नगर परिषद पिंपळनेर
हेही वाचा –
‘फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी-उद्धव ठाकरेंनी माफी मागावी’ : संजय निरुपम
Kanchanjungha Express accident : कांचनजंगा एक्सप्रेसवर मालगाडी कशी धडकली? कारण आले समोर