रायगड: महाडमध्ये ३० जवानांचे एनडीआरएफ पथक दाखल

रायगड: महाडमध्ये ३० जवानांचे एनडीआरएफ पथक दाखल

महाड: Bharat Live News Media वृत्तसेवा : कोकणातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर ३० जवानांचे एनडीआरएफ पथक महाडमध्ये दाखल झाले आहे. दोन वर्षांपूर्वी नैसर्गिक आपत्ती व महापुरामध्ये अब्जावधी रुपयांची हानी झाली होती. अनेक कुटुंबे महापुरात सापडली होती. या बाबी लक्षात घेऊन पावसाळ्यामध्ये एनडीआरएफचे पथक महाडमध्ये ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता, असे महाडचे प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांनी सांगितले.
पथकामध्ये  २८ पुरुष व २ महिला जवानांचा समावेश
शनिवारी रात्री पथक महाडमध्ये दाखल झाले असून नगर परिषदेच्या दस्तुती नाक्यावरील रमा विहारमध्ये कॅम्प लावला आहे. या पथकाकडे अद्ययावत उपकरणांसह चार फायबर होडी, वायरलेस सेट, अन्यसामग्रीचा समावेश आहे. या पथकामध्ये एकूण ३० जवानांमध्ये २८ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे.
30 जवानांच्या पथकाचे प्रमुख टीम कमांडर म्हणून इन्स्पेक्टर जीडी दिलीप कुमार यांच्याकडे जबाबदारी आहे. एएसआयजीडी  म्हणून रितेश कुमार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
नागरिकांमध्ये सुरक्षितते संदर्भात जागृती निर्माण करण्यात येणार
मीडिया प्रमुख तुळशीदास वारुडे यांनी ‘दैनिक Bharat Live News Media’शी सांगितले की, आगामी काळात महाड पोलादपूर तालुक्यातील प्राधान्याने दरडग्रस्त गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांमध्ये सुरक्षितते संदर्भात जागृती निर्माण करण्यात येणार आहे. जवानांमध्ये बिहार, कर्नाटक, ओरिसा, केरळ व महाराष्ट्र येथील जवानांचा पथकामध्ये समावेश आहे. दोन महिला जवान केरळ व महाराष्ट्र येथून नियुक्त करण्यात आल्या आहेत.
महाड येथे कायमस्वरूपी एनडीआरएफचा तळ स्थापन्याचा  धोरणात्मक निर्णय
दरम्यान, कोकणातील झालेल्या मागील काही वर्षातील नैसर्गिक आपत्तीची गंभीर दखल घेत राज्य शासनाने महाड येथे कायमस्वरूपी एनडीआरएफ चा तळ स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घोषित केला होता मात्र या संदर्भात अद्याप  केंद्र शासनाकडून मंजुरी प्राप्त झाली नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राज्य पातळीवर असणाऱ्या एसडीआरएफ च्या पथकाला महाडमध्ये नियुक्त करावे, अशी मागणी महाड परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा 

रायगड : काळ नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्‍याने खळबळ!
रायगड: पहिल्याच पावसात खैरे येथे दरड कोसळली; नागरिक भयभीत
रायगड: आंबेवाडी येथे अर्धवट कामामुळे महामार्ग पाण्यात, वाहनधारकांची कसरत