परभणी: माहेरहून २ लाख आणण्यासाठी मुलासह विवाहितेला घराबाहेर हाकलले
पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा: माहेरहून २ लाख घेऊन ये, असा तगादा लावत शिवीगाळ, मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ करुन मुलासह विवाहितेला घराबाहेर हाकलून दिले. या प्रकरणी पती, सासू, सासरे, जाऊ, नणंद यांच्याविरोधात पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा शहरातील गवळीगल्ली येथील २४ वर्षीय तरुणीचे ४ वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील बजाज नगरातील समाधान रमेश पतंगे यांच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, लॉकडाऊन काळात लग्न झाल्याने काही सामान दिले नाही म्हणून पती समाधान, लक्ष्मीबाई रमेश पतंगे (सासू), रमेश सुखदेव पतंगे (सासरा), प्रिया (नणंद), सचिन रमेश पतंगे (दीर), गीतांजली सचिन पतंगे (जाऊ) यांनी विवाहितेला त्रास देण्यास सुरूवात केली. त्यामुळे विवाहितेच्या वडिलांनी सासरी येऊन १ लाख रुपये दिले. तरीही विवाहिता गर्भवती असताना शिवीगाळ करुन तिला मारहाण सुरूच होती. तिला प्रसुतीसाठी माहेरी पाठविले नाही.
त्यानंतर आई वडिलांनी तिला माहेरी पूर्णा येथे आणले. तेथेही पती मद्यपान करुन येत आणि त्रास देवून मारहाण करत होता. त्यानंतर सासरच्यांनी व्यवसाय करण्यासाठी माहेरहून २ लाख आणण्यासाठी तिला शारीरिक, मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली. शिवीगाळ, मारहाण करत लहान मुलासह तिला घराबाहेर हाकलून दिले. अखेर महिलेने परभणी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला भरोसा सेल कक्षात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पूर्णा पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांवर पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मनोज नळगीरकर करीत आहेत.
हेही वाचा
परभणी: माटेगाव येथे शेती कर्जाला कंटाळून तरुणाने जीवन संपविले
परभणी : पूर्णेत मराठा समाजाचे सरकारविरूद्ध बोंब मारो आंदोलन
परभणी: मानोली येथे पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला